धुळ्यात बनावट दारूची ‘पुष्पा स्टाईल’ वाहतूक रोखली : चालकाला अटक ; तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता


‘Pushpa style’ traffic of fake liquor stopped in Dhulai: driver arrested; 3 lakh worth of goods seized… धुळे : चंदन तस्करीच्या अनोख्या फंड्यामुळे चर्चेत आलेल्या पुष्पा चित्रपटानंतर मद्य तस्करांनी छोटा हत्ती वाहनाला विशिष्ट कप्पा तयार करून त्याद्वारे बनावट देशी दारूची वाहतूक केल्याचा प्रकार समोर आला आहे मात्र धुळे गुन्हे शाखेने या वाहनाला पकडत चालकाला बेड्या ठोकल्या आहेत शिवाय बनावट गावठी दारूसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चालकासह चौघांविरोधात चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चालकाला बेड्या : तिघांचा कसून शोध
धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना एका वाहनातून बनावट देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला. मंगळवार, 2 रोजी जामचा मळा येथे वाहन (एम.एच.15 डी.के.2027) ची तपासणी केल्यानंतर त्यात विशिष्टरीत्या बनवलेल्या कप्प्यात देशी दारू आढळल्याने ती जप्त करण्यात आली. वाहनातून 74 हजार 200 रुपये किंमतीची देशी टँगो दारू (प्लॉस्टीक बाटलीत), 23 हजार 240 रुपये किंमतीची टँगा पंच दारू (काचेच्या बाटलीत), पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल तसेच दोन लाख रुपये किंमतीचे छोटा हत्ती वाहन जप्त करण्यात आले. एकूण तीन लाख दोन हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.






बनावट दारूचे रॅकेट समोर येण्याची शक्यता
चालक चंद्रप्रकाश गहिंदल पाटील (55, पद्मनाभ नगर, मोगलाई, धुळे) यास अटक करण्यात आली तर संशयित नारायण माळी (रा.शिरपूर), श्रीराम बाबर, महेंद्र चौधरी (दोन्ही रा.साक्री, जि.धुळे) यांनी बनावट दारू भरून वाहनात ठेवल्याची कबुली दिल्याने त्यांनाही सहआरोपी करण्यात आले. दरम्यान, तिघा संशयितांचा शोध सुरू करण्यात आला असून त्यांच्या अटकेनंतर बनावट दारू बनवणार्‍यांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, सहाय्यक निरीक्षक गणेश फड, संजय पाटील, श्याम निकम, मच्छिंद्र पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, प्रकाश सोनार, संतोष हिरे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, तुषार सूर्यवंशी, प्रल्हाद वाघ, योगेश साळवे, प्रशांत चौधरी आदींच्या पथकाने केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !