धुळ्यात बनावट जीएसटी अधिकार्‍यांना बेड्या


धुळे : धुळ्यातील बनावट जी.एस.टी. अधिकार्‍यांच्या प्रकरणात तीन जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे अटकेतील दोघे धुळे पोलिस दलातील कर्मचारी असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्वाती पाटील (रा. नाशिक), बिपीन पाटील, इम्रान शेख (दोन्ही रा. धुळे) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

असे आहे फसवणूक प्रकरण
धुळ्यातील जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून एका व्यापार्‍याची गाडी अडवत देयकात चूक असल्याचे सांगून ऑनलाईन दंड उकळण्यात आला होता. कश्मिरसिंग बाजवा (59, विकास कॉलनी, पतियाला,पंजाब) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तीन ते चार व्यक्तींनी लाल दिव्याच्या गाडीत येवून वाहन अडवले. चालकाला आपण जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून वाहनातील मालाच्या पावत्यांची मागणी केली. यावेळी देयकात संस्थेच्या नावात चूक असल्याचे सांगून बनावट जीएसटी अधिकार्‍यांनी काश्मिरसिंग यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. कश्मिरसिंग यांच्याकडे दंडापोटी 12 लाख 96 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीत ही रक्कम एक लाख 30 हजार रुपयांपर्यंत आली. गुगल पेद्वारे रक्कम स्विकारून कश्मिरसिंग यांची फसवणूक केली. याप्रकरणी चार जानेवारी रोजी कश्मिरसिंग यांनी आझाद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.






तांत्रिक विश्लेषणाअंती आरोपी जाळ्यात
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी तपासाच्या सूचना दिल्यानंतर सहायक अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी व निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी स्वतंत्र पथक तयार केले. तांत्रिक विश्लेषणावरून स्वाती पाटील (रा. नाशिक), बिपीन पाटील, इम्रान शेख (दोन्ही रा. धुळे) हे संशयित असल्याचे निश्चित केले. पैकी बिपीन आणि इम्रान हे धुळे पोलीस विभागात आहेत. या तिघांनाही 31 जानेवारी रोजी अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्याची माहिती घेण्यात आली. तिघा संशयितांनी कश्मिरसिंगसह अन्य व्यापार्‍यांकडून तब्बल 71 लाख 33 हजार 984 रुपयांची रक्कम उकळून फसवणूक केल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर संशयित पसार असल्याची माहिती अधीक्षक धीवरे यांनी दिली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !