भाजपात जाण्याच्या चर्चेनंतर आमदार एकनाथराव खडसेंनी केलेले ते ट्विट चर्चेत !

The tweet made by MLA Eknathrao Khadse after the discussion of going to BJP is in discussion! भुसावळ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथराव खडसे भाजपात जात असल्याच्या चर्चा आठ दिवसांपासून होत असताना आमदार एकनाथराव खडसे यांनी खुद्द भाजपात जाणार नसल्याचे सुतोवाच केले होते शिवाय त्यांनी आता त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून तशी माहिती दिल्यानंतर कार्यकर्त्यांचा संभ्रम दूर झाला आहे.
भाजपातील अन्यायानंतर खडसेंचा राष्ट्रवादीत झाला होता प्रवेश
एकनाथराव खडसे यांना भोसरी येथील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात जून 2016 मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर त्यांना 2019 मध्ये उमेदवारी देखील नाकारण्यात आली होती तर त्यांच्या जागी तिकिट मिळालेल्या त्यांची कन्या अॅड.रोहिणी खडसे यांचाही पराभव झाला होता. भाजपामध्ये अन्याय होत असल्याचे सांगत आमदार एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर आमदार खडसेंची विरोधी गटनेता पदी निवड झाली तर आमदारकीही मिळाली होती शिवाय कन्या अॅड.रोहिणी खडसे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले.
पुन्हा पक्ष प्रवेशाच्या चर्चा अन खडसेंनी मांडली भूमिका
जळगाव जिल्हा दौर्यावर येत असलेले अमितभाई शहा यांच्या उपस्थितीत आमदार एकनाथराव खडसे हे पुन्हा भाजपात प्रवेश करीत असल्याच्या चर्चा जोरदारपणे सुरू असताना काल जळगावात मंत्री महाजनांनीदेखील आमदार खडसे यांचे भाजपात येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली होती मात्र आमदार एकनाथराव खडसे यांच्याशी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ प्रतिनिधीने संवाद साधल्यानंतर आपला भाजपात जाण्याचा कोणताही विचार नाही किंवा आपल्याला तशी ऑफरही नसल्याचे आमदार खडसे यांनी स्पष्ट केले शिवाय त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून त्यांनी आपल्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा म्हणून अशा चर्चा पसरवल्या जात असल्याचे म्हटले आहे. आपण राष्ट्रवादीत आहोत अन राहू त्यामुळे कार्यकर्ते व नागरीकांनी अशा अफवांकडे दुर्लक्ष करावे, असे खडसे यांनी म्हटले आहे.
गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे.
— Eknath Khadse (@EknathGKhadse) February 13, 2024


