लखनऊ एक्स्प्रेसमधून अडीच लाखांच्या दागिन्यांची चोरी : भुसावळातील चोरटे जाळ्यात
भुसावळ : उल्हासनगरच्या महिलेचे लखनऊ एक्स्प्रेसमधून तब्बल अडीच लाखांचे दागिने चोरीला गेल्यानंतर अवघ्या 24 तासात रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने भुसावळातील दोघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून एक लाख 80 हजारांची दागिने जप्त करण्यात आले असून अन्य चोरटा मात्र पसार झाला असून उर्वरीत ऐवज त्याच्याकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
24 तासात आरोपी जाळ्यात
शालु संदीप सिंह (उल्हासनगर) ही महिला 16 ऑगस्ट रोजी 12108 लखनऊ-एलटीटी एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक दोन मधील बर्थ क्रमांक 70 वरून प्रवास करीत असताना चोरट्यांनी दोन लाख 36 हजारांचे दागिने लांबवले होते. भुसावळ आल्यानंतर दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने आरडा-ओरड करीत डब्यातील तिकीट निरीक्षकासह गस्तीवरील रेल्वे सुरक्षा बलाला माहिती दिली होती. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या विशेष पथकाने रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दुसर्या दिवशी 17 रोजी मुसाफीर खान्यात संशयास्पदरीत्या फिरणार्या रोशन अली (20) व सलमान खान (22, जाम मोहल्ला, भुसावळ) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एक लाख 80 हजारांचे दागिने जप्त केले तर अन्य दागिने घेवून त्यांचा साथीदार जावेद अली पसार असल्याचे सांगण्यात आले.