मनोज जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांचा परखड इशारा : सरकारच्या संयमांचा अंत पाहू नका !


Chief Minister’s stern warning to Manoj Jarange Patil : Don’t see the end of the government’s patience! मुंबई : कायद्यापेक्षा कुणीही स्वत:ला मोठं समजू नये. सरकारने संयम ठेवला आहे, संयमाचा अंत पाहू नका, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आंदोलनकर्त्यांना रोखठोक मत मांडत इशारा दिला आहे.

प्रत्येकाने आपल्या मर्यादेत रहावे
राजकीय पदावरील लोकांबाबत अर्वाच्य भाषेत बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. देवेंद्र फडणवीसांबाबत अचानक त्यांनी आरोप करणे हे, त्यांना कुणी करायला सांगितलंय का? प्रत्येकाने आपापल्या मर्यादेत राहायला हवे. तुमच्या आक्रमकतेचा समाजाला त्रास होता कामा नये. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. जर काही लोकांना वाटत असेल की त्यांच्या गोष्टी सरकारला कळत नाहीत तर तसे मुळीच नाही. गृहविभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी जे लोक जबाबदार असतील, त्यांना सरकार पाठिशी घालणार नाही, असा कणखर इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.

जरांगेंकडून सातत्याने मागण्यांमध्ये बदल
मुख्यमंत्री म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे तशीच जनतेचीही आहे त्यामुळे सगळ्यांनीच संयम पाळायला हवा. कुणीही कायदा हातात घेऊ नये. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी प्रामाणिक भावना मनात ठेवून लढ्यात उतरले होते तेव्हा आम्ही त्यांच्याशी सामंजस्याने चर्चा केली. पण ते वारंवार मागण्या बदलताना दिसतात. मराठा आंदोलनाचे 56 मोर्चे आधीही झाले पण कुठेच हिंसाचार झाला नव्हता.

तर अशा लोकांपासून सावध रहा
कुठल्याही समाजाला त्रास होऊ नये, अशी आंदोलने करायला हवीत. सरकार कुठे कमी पडतंय ते दाखवा, त्यात सुधारणा करू. पण काही लोकं अराजकता पसरवण्याचेच काम करताना दिसतात. मराठा समाज संयमी आहे. पण त्यांच्या आंदोलनाला कुणी गालबोट लावण्याचं काम करत असेल, तर त्यांच्यापासून मराठा तरुणांनी सावध राहायला हवे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


कॉपी करू नका.