टीक टॉकच्या व्हिडिओने घेतला जळगावातील तरुणाचा बळी
जळगाव : टीक टॉकच्या व्हिडिओ बनवताना तोल गेल्याने सुप्रीम कॉलनीतील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी एक वाजता मेहरुण तलावात घडली. पांडुरंग मारोती आठरे (22) असे मृत तरुणाचे नाव आहे. चालक मित्र व मेहुण्यांच्या भावासोबत पांडुरंग आठरे हा तरुण तलावावर पोहण्यासाठी गेला होता मात्र मेव्हण्यांचा भाऊ महादू हा पोहत लांबवरून निघून गेला तर यावेळी पांडुरंग हा त्याच्या मित्रांसोबत पाण्यात उतरुन मोबाईलमध्ये टीकटॉकचा व्हिडीओ करत असताना त्याचा तोल गेल्याने तो बुडाला.
शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात
भंगाळे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितल्यावर पाडुरंगचे कुटुंबिय मृतदेह थेट घरी घेवून गेले होते. तलावात कुणीतरी बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली मात्र तो कुठला रहिवासी हे कळत नव्हते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, सतीश गरजे यांना मयत तरुण सुप्रिम कॉलनीतील रहिवासी असल्याचे कळाल्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरु केली. अखेर रात्री 8 वाजेच्या सुमारास पोलिसांना पांडुरंगचे घर सापडले. विशाल सोनवणे यांनी कुटुंबियांना पाडुरंगचे शवविच्छेदन करावे लागेल, असे सांगितले. मात्र कुटुंबियांनी नकार दर्शवित आता सर्व तयारी झाली असून सर्व नातेवाईकही जमले आहे, असे सांगितले. यावरुन काही काळ गोंधळ उडाला. अखेर समाजातील इतरांनी कुटुंबियांची समजूत घातली. यानंतर 8.30 वाजेच्या सुमारास मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. दरम्यान, मयत पांडुरंग याच्या पश्चात वडील मारोती, आई कावेरी, मोठा भाऊ किरण, बहिण अर्चना, वहिनी असा परिवार आहे.