भुसावळातील यशोधरा नगरात रस्त्यांअभावी नागरीकांचे हाल


पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : खासदार रक्षा खडसेंना साकडे

भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला जोडणार्‍या मात्र नगरपरीषद हद्दीबाहेरील माता यशोधर नगरात रस्त्यांअभावी आबालवृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्त्यांसंदर्भात पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याने नुकतेच खासदार रक्षा खडसे यांच्याकडे याबाबत गार्‍हाणे मांडण्यात आले. तत्कालीन पालकमंत्री संजय सावकारे यांच्या काळात या भागातील रस्त्यांना मंजुरी मिळाल्यानंतरही चार वर्षात कामांना मुहूर्त मिळाला नसल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आहे.

खासदारांकडे मांडल्या व्यथा
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत काँग्रेस अनु. जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्यासह नागरीकांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे व्यथा मांडत दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. सर्वे क्रमांक 63, 62 तसेच 62/1, 61/1 मधील शेकडो नागरीकांना वापर करण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पाऊस पडल्यानंतर या रस्त्यावरून चारचाकी वाहने, ट्रॅक, ट्रॅक्टर जीव मुठीत घेवून रस्त्याच्या कडेला लावावी लागतात. शहराबाहेर असलेल्या या परीसरात गॅस सिलिंडरची रीक्षादेखील येत नाही शिवाय रात्रीच्या पथदिवे नसल्याने चोर्‍या होण्याचे प्रमाण वाढले आहे. याप्रसंगी खासदार खडसे यांनी रस्त्याबाबत दखल घेण्याचे आश्‍वासन दिले.

भुसावळकरांची हाडे झाली खिळखिळी
शहर हद्दीबाहेरील रस्त्यांच्या दुरवस्थेप्रमाणेच शहरातील रस्त्यांची वेगळी अवस्था नाही. महाजनादेश यात्रेनिमित्त भुसावळात येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी का होईना सत्ताधार्‍यांनी रस्त्यांचे खड्डे बुजवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे समाधान आहे. बसस्थानक रोड, आरपीडी रोड, यावल रोड, जळगाव रोड या मुख्य रस्त्यांची चाळण झाली आहे शिवाय अंतर्गत कॉलन्यातील रस्त्यांचे कामही रखडले आहे. अमृत योजनेचा गवगवा करून रस्त्यांची कामे होत नसल्याची भूमिका मांडण्यात येत असलीतरी किमान पाईप लाईन अंथरल्यानंतर खड्ड्यांची दबाई करून रस्त्यांची डागडूजी का केली नाही ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

चार वर्षानंतरही नाही झाले काम -विवेक नरवाडे
माता यशोधरा नगरातील रस्त्यास तत्कालीन पालकमंत्री आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून मंजुरी मिळाली असूनही चार वर्ष उलटूनही प्रत्यक्षात रस्त्याचे काम झालेले नाही. खराब रस्त्यांमुळे नागरीकांचे हाडे खिळखिळी झाली असून प्रचंड मनस्ताप सोसावा लागत असल्याचे विवेक नरवाडे म्हणाले.


कॉपी करू नका.