भाजपात घरवापसी करणार का ? आमदार खडसे म्हणाले ; राष्ट्रवादीने आपल्याला मदत केली मात्र….!


Will you return home to BJP? MLA Khadse said; NCP helped us but…! भुसावळ  : भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात दाखल झालेले ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे लवकरच स्वगृही परतत आहे. या संदर्भात पडद्याआड अनेक हालचाली सुरू असून पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी सोमवारी दिल्लीत आमदार खडसे दाखल झाले होते तर त्यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसेदेखील दिल्लीत असल्याची चर्चा होती मात्र आमदार खडसे हे खरोखर भाजपात जाणार का? या प्रश्नावर आमदार खडसे यांनी बुधवारी जळगावातील आपल्या निवासस्थानी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीने आपल्याला मदत केली त्यामुळे भाजपात जाण्याचा तूर्त प्रश्नच नाही. एका दिवसात पक्ष बदलण्याचे निर्णय होत नसतात त्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल शिवाय आपल्या पक्षालाही विश्वासात घ्यावे लागेल, असे आमदार खडसे यांनी सांगितले. दरम्यान, आमदार खडसे हे स्वगृही परतल्यास लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मोठा हादरा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तूर्तास या चर्चेला अर्थ नाही
भाजपात प्रवेश करीत असल्याच्या व दिल्लीत दाखल झाल्याच्या प्रश्नावर आमदार खडसे म्हणाले की, माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये फारसे तथ्य नाही. भाजपात जाण्याचा निर्णय एका दिवसात होणार नाही. विश्वासू
कार्यकर्ते व सहकार्‍यांना विचारात घेवून निर्णय घ्यावा लागेल तसेच राष्ट्रवादी पक्षालाही त्यासाठी विश्वासात घ्यावे लागेल. तूर्तास या चर्चेला अर्थ नाही मात्र जेव्हा पक्ष प्रवेश करावयाचा असेल तेव्हा सांगून जाईल, असे आमदार खडसे म्हणाले.

हा तर उन्मेष पाटलांचा वैयक्तिक प्रश्न
चाळीसगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर ते उबाटा गटात प्रवेश करीत असल्याच्या प्रश्नावर आमदार खडसे म्हणाले की, खासदार उन्मेष पाटील टॉप टेन खासदारांमधील व एक सक्षम खासदार होते मात्र चांगले काम करीत असताना त्यांची उमेदवारी कापली गेल्याने ते कदाचित उबाटा गटात प्रवेश करीत असावेत, असे आमदार खडसे म्हणाले. त्यांनी कुटे जावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, दिल्लीत हे न्यायालयीन कामकाजानिमित्त आपण गेल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

मंत्री महाजनांना टोला : प्रयत्नांची मला आवश्यकता नाही
मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार खडसे हे भाजपात दाखल होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे अलीकडे म्हटले होते. याबाबत आमदार खडसेंना छेडले असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मला भाजपात येण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक वरीष्ठांशी आपले अत्यंत चांगले संबंध आहेत त्यामुळे मला प्रवेशासाठी फारसे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. आमदार मंगेश चव्हाणांनी खडसेंचा भाजपात प्रवेश झाल्यास ते आमच्या कार्यकर्त्याला ज्युनिअर
असतील अशी टिका केली होती. यावर आमदार खडसे म्हणाले की, त्यांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष देण्याचे गरज नाही किंवा सर्वांच्याच प्रश्नांना उत्तरे देण्याची गरज नाही.

भाजपात प्रवेशाची चर्चा मात्र कायम
आमदार खडसे यांनी तूर्तास भाजपात प्रवेशाचा इन्कार केला असलातरी सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात आमदार खडसे हे भाजपात प्रवेश करतील शिवाय प्रवेशानंतर मोठ्या राजकीय घडामोडीदेखील घडतील, असा सूत्रांचा कयास आहे.


कॉपी करू नका.