भाजपा जळगाव मतदारसंघाचा उमेदवार बदलणार का ? मंत्री गिरीश महाजन म्हणाले…!

Will BJP change the candidate of Jalgaon constituency? Minister Girish Mahajan said…!
जळगाव : विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभेसाठी भाजपाने तिकीट जाहीर केले होते मात्र तिकीट कापल्यानंतर नाराज असलेले माजी खासदार उन्मेष पाटील हे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह शिवसेना उबाटा गटात दाखल झाल्यानंतर लढत अत्यंत चुरशीची होणार हे आता स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर जळगावात भाजपाने माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांच्याशी बंदद्वार चर्चा केली मात्र या चर्चेनंतर भाजपाने उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू केल्याच्या अफवा पसरल्या मात्र या अफवांवर आता खुद्द ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, उमेदवार बदलण्याच्या केवळ तुमच्याकडे चर्चा आल्या आहेत मात्र भाजपामध्ये अशी कुठलीही चर्चा नाही. जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिताताई वाघ या उमेदवार पाच लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील, असेही महाजन म्हणाले.
उमेदवारी बदलाच्या केवळ माध्यमांमधून चर्चा : मंत्री महाजन
जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ या किमान पाच लाखांच्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी जळगाव भाजपा कार्यालयाबाहेर माध्यमांशी बोलताना केला. या देशाला महाशक्ती, विश्वगुरू करायचे आहे त्यामुळे तरुणांच्या मनातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करावयाचे असल्याने भाजप उमेदवाराचा विजय होईल, असेही मंत्री महाजन म्हणाले. जळगाव लोकसभेसाठी विद्यमान उमेदवार स्मिता वाघ या किमान पाच लाखांच्या मताधिक्क्याने निवडून येतील, असा दावा त्यांनी करीत माझा दावा कधीही चुकीचा ठरत नाही, असे सांगत जळगावातील उमेदवार बदलणार या केवळ अफवा असल्याचे सांगून या विषयावर अधिक बोलणे टाळले.

माजी खासदारांची भेट अन् चर्चांना उधाण
मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथील भाजपा जी. एम. फाउंडेशन कार्यालयात प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या तसेच माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांची देखील काल मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत बंदद्वार चर्चा झाली. चर्चेचा तपशील बाहेर आला नसलातरी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली गेली तर भाजपा उमेदवार बदलणार या चर्चांना वेग आला मात्र आता चर्चांवर खुद्द मंत्री महाजनांनी पडदा टाकला आहे.
माजी खासदार ए.टी.पाटील म्हणाले, पक्षाचा आदेश पाळणार
दोन टर्म खासदार राहिललेया ए.टी.नाना पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर ते भाजपातच होते. माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना ते म्हणाले की, मी भाजपात सक्रिय होतो, पक्षाने दिलेल्या जबाबदार्या पार पाडत होतो, माझंही तिकीट कापलं, पण मी पक्ष सोडून गेलो नाही, मी यावेळीही तिकीट मागितलं होतं मात्र ते दिलं नाही, तरीही पक्ष जो आदेश देईल त्या प्रमाणे काम करेल, असेदेखील त्यांनी सांगितले आहे.