रावेरात सकाळपासूनच मतदारांच्या लागल्या रांगा

56.85 टक्के मतदान ः दुपारनंतर मतदारांचा वाढला उत्साह


रावेर : रावेर लोकसभेसाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत रावेर मतदारसंघात मतदारांनी सकाळी सात वाजेपासून मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र होते. निवडणुकीत कुठेही गैरप्रकार घडला नाही अथवा कुठेही ईव्हीएम बंद पडले नसल्याची तक्रार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सोमवारी सकाळी मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे काही अंशी मतदरांची धांदल उडाली मात्र काही वेळेत पाऊस थांबताच मतदारांचा उत्साह पुन्हा वाढला. ढगाळ वातावरण असल्यामुळे सकाळपासूनच मतदारांच्या मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या होत्या रावेर विधानसभेत सकाळी सात ते सायंकाळी पाचदरम्यान 56.85 टक्के मतदान झाले तर रावेर लोकसभा मतदारसंघात सुमारे 62 टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पावसामुळे काही वेळ आला व्यत्यय
सोमवारी सकाळी सात वाजेपासून रावेर विधानसभा मतदार संघांतर्गत 314 मतदान केंद्रावर मतदानास शांततेत सुरूवात झाली. सोमवारी सकाळी सात वाजेपासून रावेर शहरासह मतदारसंघात काही मतदान केंद्र वगळता सर्वत्र मतदारांच्या रांगा लागल्या. सकाळी साडे आठपासून शहर व परिसरात पावसाला सुरूवात झाल्याने मतदान केंद्र आवारातील मतदार बंदोबस्तासाठी आलेले पोलीस कर्मचार्‍यांना व्हरांड्याचा आसरा घ्यावा लागला. यानंतर दुपारी 12 वाजेपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने मतदानाच्या रांगा काही ठिकाणीच दिसल्या. दुपारी चार वाजेनंतर पुन्हा नागरिकांनी गर्दी केल्याने मतदान केंद्रावर लांबच-लांब रांगा दिसून आल्या. सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी सहकुटूंब मतदान क्रमांक 95, एन.एम.अकोले विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी खिरोदा येथे त्यांच्या गावी सहकुटूंब मतदान केले. राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील व भाजपाचे उमेदवार रक्षा खडसे यांना मतदान केंद्रावर भेटी दिल्या.

दुपारनंतर वाढला मतदानाचा टक्का
सकाळी 7 ते 9 दरम्यान 24 हजार 803 पैकी 8.28 टक्के मतदारांनी हक्क बजावला तर सकाळी 9 ते 11 दरम्यान एकूण मतदान 62 हजार 777 एकूण 20.95 टक्के मतदारांनी हक्क बजावला. सकाळी 11 ते 1 दरम्यान एक लाख नऊ हजार 695 पैकी 36.93 टक्के मतदारांनी तसेच दुपारी एक ते तीन दरम्यान एक लाख 51 हजार 198 पैकी 50.46 टक्के मतदारांनी हक्क बजावला.

ढगाळ वातावरणामुळे वाढली टक्केवारी
सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यात सकाळी साडेआठच्या सुमारास सुमारे अर्धा तास पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे मोठ्या उत्साहात मतदान करण्यासाठी मतदार घराबाहेर पडले. सुमारे 12 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते त्यामुळे ऊन जाणवत नव्हते. मोठ्या संख्येने मतदारांनी मतदान केंद्र गाठले व केंद्रावर रांगा लागल्या. गारवा व ढगाळ वातावरणामुळे मतदार मोठ्या घराबाहेर निघाल्याने मतदानाची टक्केवारी वाढली. मतदार दुपारी रीक्षाने मतदान केंद्रावर दाखल झाले तर काही आपल्या वाहनाने दाखल झाले.

पालला महिला बचत गटाचे मतदान
पाल : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत पाल परिसरात महिलांनी हक्क बजावला. सकाळी पावसात तर दुपारी उन्हात मतदानाच्या ठिकाणी सकाळपासून रांगा दिसून आल्या. या अभियानात उमेद समुदाय संशाधन व्यक्तींनी मतदान जागृती अभियान राबवले. तब्बल 65 महिला बचत गटाच्यां महिलानी पिवळी साडी नेसून आपला मतदानाचा हक्क बजावला.

सावदा येथे 65.44 टक्के मतदान
सावदा : शहरात 23 बुथर शहरातील एकूण 19 हजार 59 पैकी 12 हजार 470 मतदारांनी हक्क बजावला तर 65.55 टक्के मतदान झाले. शहरातील आ.गं.हायस्कूलमधील मतदान केंद्रावर बनाना सिटी केळीच्या थीमवर आधारीत केळी पाने घडासोबत लावून मतदान केंद्र उभारणी करण्यात आली तर सेल्फि पॉईंट आकर्षण ठरले. शहरातील इतर केंद्रावर मात्र फारश्या सोयी उपलब्ध नसल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी मंडप व्यवस्था वा पिण्याचे पाणी नव्हते त्यामुळे दुपारी मतदारांना मात्र त्रास सहन करावा लागला, शहरात सकाळपासून मतदानाचा उत्साह दिसून आला. सकाळीच शहरातील आजी-माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, पदाधिकारी, डॉक्टर यांच्यासह सामान्य नागरिकांनीदेखील मतदान केले तर प्रथम मतदान करणार्‍या नवमतदारांचा उत्साह दिसून आला. दुपारी एक वाजेपर्यंत साधारण 35 टक्के मतदान झाले होते मात्र दुपारनंतर मतदानासाठी पुन्हा गर्दी झाली. 90 वर्षांच्या आजीने देखील येथे मतदानाचा हक्क केंद्रावर येऊन बजावला. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी येथील आ.गं.हायस्कूलमधील मतदान केंद्रास भेट देऊन पाहणी केली, अनेक नागरिकांची नावे आढळून न आल्याने त्यांना मतदानापासून वंचित रहावे लागले. काही मतदान केंद्रावर सायंकाळी 6.30 पर्यंत मतदान सुरू होते.


कॉपी करू नका.