पुण्यातील अपघातात दोघांचा मृत्यू : आरोपीला फायदा पोहोचण्यासाठी पोलिसांकडून तपासात घोळ !
पुणे : पुण्यात झालेल्या अपघाताचे प्रकरण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. पुणे अपघात प्रकरणी आरोपीला फायदा पोहचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत. पहिल्या एफआयआर मध्ये अनेक त्रुटी ठेवल्या होत्या यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होत असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ट्विटद्वारे केली चौकशीची मागणी
वडेट्टीवार यांनी घाटकोपर प्रकरणी एसआयटी नेमली तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी, अशी मागणी करत पुणे पोलिसांची देखील चौकशी व्हावी असे आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे. पहिल्या एफआयआर मध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती?ही दिशाभूल का केली जात आहे? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
पुणे पोलिसांवर गंभीर आरोप
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणार्या अल्पवयीन मुलाचे वडील आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालसह दोन जणांना पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरातील एका लॉजमधून अटक केली. आलिशान पोर्शे कारचे जीपीएस ट्रॅक करत पुणे पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला होता.
मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या सहाय्याने पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. पहाटे साडेचारच्या सुमारास पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांचे पथक शहरात दाखल झाल्यावर आरोपींना त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. शनिवारी पुण्यातील कल्याणीनगरात रात्री उशिरा विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून कार चालवून दुचाकीवर असलेल्या एक तरुण तरुणीला चिरडले होते. या प्रकरणात आता पुणे पोलिसांवर अनेक गंभीर आरोप होत आहे.