पाल वन्यजीव अभयारण्यात बिबट्याचा अधिवास

बुद्धपौर्णिमेला प्राणिगणनेत आढळले 330 वन्यप्राणी

0

पाल, ता.रावेर (गिरीश पाटील) : बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाल वन्यजीव अभयारण्यात करण्यात आलेल्या पाणवड्यावरील प्राणी गणनेत 15 वेगवेगळ्या वन्य प्रजातीच्या प्राण्यांचे दर्शन झाले आहे. या प्राणी गणनेदरम्यान पाल वन्यजीव अभयारण्य व जामन्या-गाडर्‍या लंगडाआंबा वनक्षेत्रात 330 वन्यप्राणी आढळल्याची नोंद झाली आहे. यामध्ये बिबटे, चिंकारा, सायाळ, कोल्हा, लांडगा, वानर, रानडुक्कर, ससा, हरिण आदी वन्य प्राण्यांचा समावेश आहे. पाणवठ्यावर रात्री पहारा देऊन पाणी पिण्यासाठी येणार्‍या प्राण्यांची माहिती वनकर्मचारी व निसर्गप्रेमी यांनी नोंदवली. सर्व कर्मचार्‍यांची माहिती एकत्रीत करून जंगल परिक्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या आकडेवारीचा अदांज काढण्यात आला.

पाल वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चव्हाण व गाडर्‍या जामन्या लंगडाआंबा वन्यजीव वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार प्राणीगणना करण्यात आली.

पाल वन्यजीव वनक्षेत्रात आढळलेले वन्यप्राणी असे
चिंकारा-10, वानर- 1, लांडगा-4, बिबट- 1, ससा-23, मोर- 33 रानमांजर- 8, कोल्हा-26, तडस- 9, रानडूक्कर- 12, हरिण- 19, घूबड- 1 असे मिळणू एकूण 157 वन्यप्राणी आढळले.

गाडर्‍या-जामन्या लंगडा आंबा वन्यजीव वनक्षेत्रात आढळलेले वन्यप्राणी असे
माकड- 58, लांडगा+ 2, भेकर- 1, ससा- 3, मोर- 26, रानमांजर- 6, कोल्हा- 2, तडस- 4, रानडूक्कर- 70, सायाळ- 1, हरिण- 3
असे एकूण 173 वन्यप्राणी आढळले.


कॉपी करू नका.