भुसावळातील साईचंद्र नगर 36 तासानंतर वीजपुरवठा पूर्ववत

24 तासात दोन डीपी जळाल्याने वीज ग्राहक संतप्त : 200 केव्हीए क्षमतेच्या रोहिहत्रानंतर दिलासा

0

भुसावळ : यावल रोडवरील साईचंद्र नगर गेल्या 36 तासांपासून अंधारात होते मात्र शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास 200 केव्हीए क्षमतेची डीपी लावल्यानंतर या भागात वीजपुरवठा सुरळीत झाल्याने रहिवाशांना दिलासा मिळाला. गेल्या 24 तासात दोन वीज डीपी जळाल्याने वीज कंपनीचे कर्मचारीदेखील हतबल झाले तर इदुसरीकडे वीज ग्राहकांचा संतापाचा पारा वाढला. या भागात आधीच कमी-अधिक दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने वीज ग्राहकांमध्ये रोष व्यक्त होत होता त्यातच बुधवारी रात्री 12 वाजेनंतर या भागातील वीज डीपी जळाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या वीज डीपी लावण्यात आली मात्र अवघ्या दोन तासात पावणेनऊ वाजेच्या सुमारास डीपी जळाली तर शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजता पुन्हा नवीन डीपी कार्यान्वीत करण्यात आली मात्र लोड वाढताच पाच वाजेच्या सुमारास डीपी जळाल्याने रहिवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. स्थानिक नागरिकांनी तापी नगरासह सबस्टेशनमध्ये जावून आपला रोषही व्यक्त केला.

36 तासांपासून रहिवाशांना मनस्ताप
यावल रोडवरील साईचंद्र नगरवासीयांना गेल्या 36 तासांपासून विजेविना रहावे लागत असल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. गेल्या 24 तासांच्या अंतरात दोन वेळा डीपी जळाल्याने वीज कंपनीचे कर्मचारी एकीकडे हतबल झाले असताना दुसरीकडे रहिवाशांना मात्र वीजेअभावी पाणीदेखील मिळाले नसल्याने त्यांनादेखील अडचणींचा सामना करावा लागला. मुळातच या भागात शंभर केव्हीए क्षमतेची डीपी आहे मात्र त्यावर लोड वाढताच डीपी जळत असल्याने या भागात अधिक क्षमतेची डीपी लावण्याची रहिवाशांची मागणी आहे.

वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न
वीज कंपनीचे सहा.अभियंता गिरीश चौधरी म्हणाले की, दोन वेळा डीपी लावूनही ती जळाल्याने आता सावदा येथून 200 केव्हीए क्षमतेचे रोहित्र मागवून या भागात शनिवारी रात्री उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. शनिवारी दिवसभरात शंभर व 63 केव्हीए क्षमतेचे रोहित्र लावून लोड (दाब) विभागला जाईल व समस्या निकाली काढण्यात येईल. वीजपुरवठा येताच नागरिक हेवी उपकरण सुरू करीत असल्याने लोड वाढून डीपी नादुरुस्त होत आहेत.


कॉपी करू नका.