रावेरसह भुसावळ-जळगावच्या जागेसाठी एमआयएम आग्रही


भुसावळ- जिल्ह्यातील 11 विधानसभांपैकी रावेर-यावल, भुसावळ व जळगाव शहर या तीन विधानसभा मतदारसंघाच्या जागा वंचित बहुजन आघाडीत ऑल इंडीया मजलीस इत्तेहादूल मुसलमीन म्हणजे एमआयएम पार्टीला सोडण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे.
यासाठी औरंगाबादमध्ये वंचित आघाडीचे प्रणेते अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांची रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आणि खासदार जलील यांची प्रदेश कार्यालयात एकाच दिवशी भेट घेतली.

राज्यभरातील मुस्लिम समाजात उत्साहाचे वातावरण
लोकसभा निवडणुकीवेळी एमआयएम एकही जागा लढवणार नाही व पूर्ण ताकदीनिशी अ‍ॅड.बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी उभी राहील, अशी भूमिका पक्षाचे अध्यक्ष खासदार बॅरीस्टर असोद्दीन ओवेसी यांनी जाहीर केल्याने वंचित बहुजन आघाडीला राज्यातील मुस्लिम समाजाचा प्रचंड पाठिंबा दिसून आला होता. त्यानंतर अचानक औरंगाबाद लोकसभेसाठी आमदार इम्तियाज जलील यांना वंचित आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात येऊन वंचितमधील एमआयएम पक्षाने राज्यभरात औरंगाबादची एकमेव जागा आपल्या पदरात पाडून घेत एक नवा विक्रम प्रस्थापित केल्याने राज्यभरातील मुस्लिम समाजात उत्साहाचे वातावरण आहे.

तीन मतदारसंघ एमआयएमला सोडावेत
वंचित बहुजन आघाडीच्या जागा वाटपाचा फार्म्युला ठरवितांना जळगाव जिल्ह्यातील 11 पैकी रावेर-यावल, भुसावळ व जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ एमआयएम पार्टीला सोडण्यात यावे, अशी मागणी घेऊन जिल्ह्यातील पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर आणि खासदार इम्तियाज जलील यांची नुकतीच औरंगाबाद येथे एकाच दिवशी भेटी घेतल्या. यावेळी या तीनही मतदारसंघातून वंचित आघाडीच्या माध्यमातून एमआयएम पक्षाचे उमेदवार निश्चितपणे निवडून येऊ शकतात, अशी खात्री देऊन याला पुष्टी म्हणून समाज व जातीनिहाय मतदानाची आकडेवारी याबाबतचा सर्वेक्षण अहवाल प्रकाश आंबेडकर आणि खासदार जलील यांना सादर करण्यात आला.

इच्छुकांसह पदाधिकार्‍यांनी घेतली भेट
अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर व खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा होणेसाठी जिल्ह्यातील शिष्टमंडळाचे समन्वयक म्हणून वंचितचे महासचिव अमित भुईगळ व एमआयएम पक्षाचे औरंगाबाद महापालिकेतील गटनेते अरुण बोरडे यांनी महत्वाची भूमिका घेतली. चर्चेवेळी वंचित आघाडी व एमआयएम कडून उमेदवारीसाठी रावेर-यावल मतदारसंघातून इच्छुक जनसंग्रामचे संस्थापक व धोबी समाजाचे प्रदेशाध्यक्ष विवेक ठाकरे, भुसावळमधून इच्छुक नगरसेवक रवींद्र सपकाळे व पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे, जळगाव शहर विधानसभा क्षेत्रातून इच्छुक महापालिकेतील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका सुन्नबी देशमुख यांचे सुपुत्र अक्रम देशमुख या इच्छुकांसह पक्षाचे जिल्हा नेते आणि भुसावळ तालुकाध्यक्ष फिरोज शेख, महासचिव मुजाहिद शेख, शहराध्यक्ष अश्रफ तडवी, शहर कोषाध्यक्ष नावेद खान, सहसचिव कलीम शेख, आवेज खान, आरीफ शेख, इलियास पटेल, जनसंग्रामचे समन्वयक दीपक मांडोळे, भगवान कोकाटे, कार्यालयीन सचिव मिलिंद तायडे, मोईन मोहम्मद पटेल, पिंटू सपकाळे आदी उपस्थित होते.


कॉपी करू नका.