भुसावळात हाणामारी प्रकरणातील आरोपी तीन तासानंतर शहर पोलिसांच्या जाळ्यात
कंडारी तापी पात्रात तीन तास पोलिसांना दिला चकवा : घेराबंदी करताच आरोपी गवसला

भुसावळ : हाणामारीच्या गुन्ह्यात तब्बल तीन वर्षांपासून शहर पोलिसांना चकवा देणारा संशयीत भुसावळ तालुक्यातील कंडारीच्या नदीपात्रात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेतली मात्र पोलिसांना पाहताच संशयीताने तापी नदीपात्रात उडी टाकली. पोलिसांनी देखील पोलीस मित्रांची मदत घेत नदीपात्राला घेरा टाकला. कंडारीच्या खडकाळ नदीपात्रातून कधी इकडे तर कधी तिकडे उड्या मारणार्या आरोपीला घेराबंदीच्या तीन तासानंतर अटक करण्यात अखेर शहर पोलिसांना यश आले. सागर रेवालाल कहार (कंडारी, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
आरोपी सागर कहार विरोधात भुसावळ शहर पोलिसात 2021 मध्ये भादंवि 324 अन्वये हाणामारीचा गुन्हा दाखल आहे तर भुसावळ तालुका पोलिसातही तो आर्म अॅक्ट मध्ये वॉण्टेड आहे मात्र संशयीत गवसत नव्हता.
पाठ शिवणीच्या खेळात अखेर पोलिसांनी मारली बाजी
प संशयीत गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कंडारी नदीपात्रात आल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी नदीपात्राला कंडारी व अकलूदमार्गाने जावून घेरा घातला. आरोपी पोहण्यात सराईत असल्याने त्याने नदीतील पाण्याचा आसरा घेत कधी या काठावरून तर कधी त्या काठावरून पोहणे सुरू केले मात्र पोलिसांनी हार मानली नाही. तीन तासांच्या प्रयत्नांनी त्यास अटक करण्यात यश आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ईकबा सैय्यद, कॉन्स्टेबल योगेश घुगे, कॉन्स्टेबल ईसराईल खाटीक, कॉन्स्टेबल बनसोडे आदींनी केली.


