पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज शपथविधी : खान्देशातून खासदार रक्षाताई खडसेंना मंत्री पदाची संधी!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा रविवार्रें 9 जून रोजी सायंकाळी 7.15 वाजता शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवन येथे हा सोहळा होणार असून मोदी तिसर्यांदा पंतप्रधान होत आहेत. दरम्यान, खान्देशातून रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिसर्यांदा विजयी झालेल्या खासदार रक्षा खडसे यांनादेखील मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. यावेळी मोदींसोबत एकूण 18 मंत्रीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
राज्यातील चार खासदारांना संधी
मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी एनडीएच्या सर्वच घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला सर्वाधिक मंत्रीपदे मिळणार असल्याची शक्यता आहे तर महाराष्ट्रालाही महत्त्वाची मंत्रीपदे दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांची नावेही चर्चेत आहेत. केंद्रीय मंत्रीपदासाठी भाजपकडून राज्यातील चार खासदारांची नावे चर्चेत आहे. नितीन गडकरी, पीयूष गोयल, नारायण राणे आणि रक्षाताई खडसे यांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत होती. खान्देशातून रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी दिल्लीतून फोन आल्याचे सूत्रांनी सांगितले.


लोकसभाध्यक्ष, भाजपाध्यक्ष पदांसाठी या नावांची चर्चा
भाजपने लोकसभा अध्यक्षपदासाठी विविध नावांवर चर्चा सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पसंतीने एका नेत्याची त्यासाठी निवड केली जाईल. मनोहरलाल खट्टर यांच्यापासून ते शिवराजसिंह चौहान यांच्यापर्यंत काही नावांची चर्चा आहे. भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यांचा कार्यकाळ लोकसभा निवडणुकीपर्यंत वाढवण्यात आला होता. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिवराजसिंह चौहान, सी. आर. पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आरएसएसची पसंतही विचारात घेतली जाईल.
खान्देशातून खासदार खडसेंना संधी
डॉ.भारती पवार यांच्या पराभवामुळे मंत्री मंडळात महिला चेहरा देण्याचाही भाजपश्रेष्ठींवर दबाव आहे. लोकसभेवर सलग तिसर्यांदा निवडून आलेल्या रावेर लोकसभेतील खासदार रक्षा खडसे यांना मंत्री मंडळात कॅबीनेट मंत्रीपद मिळणार आहे. त्या संदर्भात त्यांना पक्ष श्रेष्ठींकडून फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली. खान्देशासाठी ही बाब गौरवास्पद आहे. बीडमधून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
संभाव्य मंत्र्यांमध्ये देशातून आणखी कोण-कोण?
अमित शाह, जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, एस. जयशंकर, अश्विनी वैष्णव, ललन सिंह, रामनाथ ठाकूर, चिराग पासवान, जीतन मांझी, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, प्रल्हाद जोशी, गिरिराज सिंह, नित्यानंद राय , ज्योतिरादित्य सिंधिया, मनसुख मंडविया, अनुराग ठाकूर, किरन रिजीजू, डॉ. जितेंद्र सिंह, सुरेश गोपीनाथ, शिवराजसिंह चौहान, फग्गनसिंह कुलस्ते, शोभा करंदलाजे, किशन रेड्डी, बंडी संजय, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुन मेघवाल







