निंभोरा येथून 12 वर्षांनंतर केळी वॅगन्स दिल्लीकडे रवाना

17 वॅगन्समधून तीन हजार 740 क्विंटल केळी दिल्लीकडे


रावेर :  निंभोरा रेल्वे स्थानकावरून तब्बल 12 वर्षानंतर 17 व्ही.पी.यू रॅक वॅगन्स दिल्लीकडे शुक्रवार, 7 जून रोजी रवाना झाले. निंभोरा स्टेशन येथून परप्रांतात केळी पाठवण्यासाठी वॅगन्स रॅक मिळावा म्हणून निंभोरा स्टेशन येथील फळ बागायतदार शेतकरी मंडळाच्या पदाधिकारी व केळी उत्पादक शेतकर्‍यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे तसेच रेल्वे विभागाच्या डीआरएम ईती पांडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. या मागणीला यश लाभल्याने शुक्रवार, 17 वॅगन्समधून केळी रवाना झाली.

12 वर्षानंतर वॅगन्सद्वारे केळी दिल्लीला
17 वॅगन्समधून सुमारे तीन हजार 740 क्विंटल केळी भरून रवाना करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष कडू चौधरी, उपाध्यक्ष मोहन पाटील, गणेश पाटील विजय महाजन, किरण नेमाडे विनोद पाटील, मनोहर चौधरी यासह मंडळ पदाधिकार्‍यांनी माहिती दिली. 12 वर्षाच्या खंडानंतर प्रथमच रेल्वे द्वारा केळी परप्रांतात जाणार असल्याने निंभोरा फळ बागायतदार मंडळाचे अध्यक्ष कडू चौधरी व संचालक किरण नेमाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, शेतकरी ललित कोळंबे यासह केळी उत्पादक शेतकर्‍यांनी रेल्वे वॅगन्स गाडीचे इंजिन चालक, गार्ड तसेच स्टेशन अधीक्षक यांचा सत्कार केला. यावेळी रेल्वे इंजिनची व वॅगन्सची विधीवत पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व केळी भरण्याचा शुभारंभ करण्यात आला. शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजे दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून वॅगन्स उशिरा मिळाल्याने रात्री उशिरा केळी वॅगन्स दिल्लीकडे रवाना झाल्या.

स्टेशन परिसर गजबजला
निंभोरा स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांची गर्दी झाली होती. स्टेशन परिसरामध्ये केळी वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची तसेच वाहन धारकांची व केळी कामगारांची, केळी उत्पादक शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यामुळे स्टेशन परिसर गजबजला होता. सर्वत्र मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने शेतकर्‍यांसोबतच मजूर वर्गांच्या चेहर्‍यावर उत्साह दिसून येत होता.


कॉपी करू नका.