न्हावी गावातून 83 हजारांच्या डीजे साहित्याची चोरी : मध्यप्रदेशातून दोघे जाळ्यात


फैजपूर : जवळच असलेल्या न्हावी गावातून डीजे वाहनातून 83 हजार रुपये किंमतीच्या साहित्याची चोरी झाली होती. चोरीची ही घटना 12 ते 16 मे दरम्यान घडली होती. फैजपूर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील दोघा चोरट्यांना अटक केली आहे. सीताराम बदला भिलाला (22, धुळावस्ती, सांगवी शिवार, मूळ रा.दवाटीया बुजूर्ग, ता.बोरी, बर्‍हाणपूर, मध्यप्रदेश) व राजू मोहन भिलाला (19, धुपी तितराणा, ता.बिस्टान, जि.खरगोन, मध्यप्रदेश, ह.मु.खिरोदा, ता.रावेर, गोपी नारखेडे यांच्या गळ्यात) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

चोरीप्रकरणी दाखल होता गुन्हा
न्हावी, ता.यावल गावातील विक्रम वामन तायडे यांनी मारूळ रोडवरील जुन्या सरकारी दवाखान्याजवळ रुद्राक्ष नामक डीजे वाहन उभे केले होते. या वाहनातून चोरट्याने 83 हजार रुपये किंमतीचे म्युझिक मिक्सर अ‍ॅम्प्लिफायर चोरी केले होते. याप्रकरणी तायडे यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फैजपूर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करीत त्यांच्याकडून बॅटरी, म्युझीक मिक्सर, अ‍ॅम्प्लीफायर तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, प्रभारी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूरचे सहा.निरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक मैनुद्दीन सैय्यद, उपनिरीक्षक बबन पाटोळे, सहाय्यक फौजदार देवीदास सूरदास, हवालदार राजेश बर्‍हाटे, हवालदार महेंद्र महाजन, हवालदार विकास सोनवणे करीत आहेत.


कॉपी करू नका.