कांचनजंगा एक्सप्रेसवर मालगाडी आदळली : 9 प्रवासी ठार


नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या दार्जिंगमध्ये रेल्वेला मोठा अपघात झाला असून त्यात 9 प्रवासी ठार झाले आहेत तर 60 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दार्जिलिंग येथे सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका मालगाडीने कांचनजंगा एक्सप्रेस (13174) ला मागून धडक दिली. त्यात कांचनजंगा एक्स्प्रेसच्या तीन डब्यांचे नुकसान झाले. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव दिल्लीहून दार्जिलिंगला रवाना झाले आहेत.

सिग्नल न दिसल्याने अपघात झाल्याची शंका
पूर्व रेल्वेच्या सीपीआरओच्या म्हणण्यानुसार, पॅसेंजर ट्रेनच्या शेवटच्या बाजूला दोन पार्सल आणि एक एसएलआर कोच जोडण्यात आला व त्यात प्रवासी नव्हते. दोन लोको पायलट आणि एका गार्डसह 9 जणांचा मृत्यू झाला असून ट्रेनच्या 5 डब्यांचे नुकसान झाले आहे.

कांचनजंगा एक्सप्रेस आगरतळाहून पश्चिम बंगालमधील सियालदहला जात असताना लाल सिग्नलमुळे एक्स्प्रेस ट्रेन सिलीगुडीतील रंगपानी स्टेशनजवळ रुईधासा येथे थांबवण्यात आल्यानंतर मागून येणार्‍या मालगाडीने धडक दिली. मुसळधार पावसामुळे मालगाडीच्या पायलटला सिग्नल दिसला नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले- ईशान्य सीमावर्ती झोनमध्ये झालेला अपघात दुःखद आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. रेल्वे, एनडीआरएफ, एसडीआरएफ एकत्र काम करत आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

 


कॉपी करू नका.