विधानसभा निवडणुकीपूर्वी घोषणांचा पाऊस : राज्याच्या अर्थसंकल्पात महिला, उद्योजक, शेतकर्यांना मोठा दिलासा
मुंबई : लोकसभा निवडणुकीत झालेल्या महायुतीच्या पराभवामुळे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारने या अर्थसंकल्पामधून अनेक लोकानुनयी योजनांची घोषणा केली आहे. या अर्थसंकल्पामध्ये महिलांना केंद्रस्थानी ठेवून काही घोषणा केल्या जातील, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानुसार आज अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार राज्यातील 21 ते 60 वयोगटामधील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये सरकारचा 2024-25 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला.
महिलांना मिळणार दरमहा दिड हजार
अर्थसंकल्पामधून मुख्यमंत्री लाडकी बहिीण योजनेची घोषणा करताना अजित पवार म्हणाले की, स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. आता ती एकूणच समाजाचा केंद्रबिंदू होते आहे. आपल्या कर्तृत्ववान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, आमच्या लेकी बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबन, आरोग्य आणि पोषणासह सर्वांगिण विकासासाठी या योजनेंतर्गत 21 ते 60 वयोगटामधील पात्र महिलांना सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये प्रदान केले जातील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
पिंक ई रिक्षा योजना
या वर्षीच्या अर्थसंकल्पात महिलांच्या स्वयंरोजगारासाठी पिंक ई रिक्षा योजनेची घोषणा केली होती. योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील 17 शहरांमध्ये 10 हजार महिलांना अर्थसहाय्य करण्यात येईल, यासाठी 80 कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.
अशा आहे अर्थसंकल्पातील घोषणा
- राज्याच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 12 हजार 293 कोटी रुपयांची तरतूद असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर
- महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ घोषित
- पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा
- शेतकर्यांकडील कृषीपंपाचे वीज बिल माफ
- वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचे अर्थसाह्य
- ‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा निधी
- 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’,
- महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना
- 52 लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना’
- महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’,
- लघुउद्योजक महिलांना 15 लाख कर्जापर्यंतच्या व्याजाचा परतावा योजना
- ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना चालू वर्षापासून अभियांत्रिकी, वस्तुशास्त्र, फार्मसी, मेडीकल, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती
- राज्यातील दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणार्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा
- ‘मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनें’तर्गत राज्यातील 44 लाख शेतकर्यांना मोफत वीजपुरवठा, दुधउत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान
- अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
- नवी मुंबईत महापे येथे जेम्स अॅन्ड ज्वेलरी पार्कची निर्मिती
- सिंधुदुर्ग येथे 66 कोटींच्या आंतरराष्ट्रीय पाणबुडी केंद्राची तसेच स्कुबा डायव्हिंग केंद्राची निर्मिती
- बारी समाजासाठी ‘संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना
- स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन
महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान उंचावणार्या अनेक निर्णयांचा अर्थसंकल्पात समावेश