20 हजारांची लाच भोवली : नवापूर मंडळ कृषी अधिकारी नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात


20 thousand bribe : Nawapur Mandal Agriculture Officer Nandurbar in ACB’s net नंदुरबार : शेततळे अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती 20 हजारांची लाच मागणी केल्याप्रकरणी नवापूर मंडळ कृषी अधिकार्‍याला नंदुरबार एसीबीने अटक केल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. सागर अशोक अहिरे (33, रा.प्लॉट नं .10, रुपाई नगर, पेरेजपूर रोड, साक्री) असे अटकेतील अधिकार्‍याचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
37 वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावावर थुवा, ता.नवापूर येथील शेत सर्वे नंबर 95/1/अ या शेतात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधण्याची मंजुरी मिळाली. शेततळ्याच्या अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी सागर अहिरे याने 20 फेब्रुवारी रोजी पंचांसमक्ष 25 हजार रुपये लाच मागणी करून तडजोडीअंती 20 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली मात्र संशयीताला सापळ्याचा संशय आल्याने त्याने लाच स्वीकारली नाही. एसीबीकडे लाच मागणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शनिवारी त्याच्याविरोधात नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार विजय ठाकरे, हवालदार विलास पाटील, नाईक देवराम गावीत, नाईक हेमंत कुमार महाले, नाईक सुभाष पावरा आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.