हतनूरचे पाणी दोन दिवसात ओझरखेडा धरणात पोहोचणार !
वरणगाव-तळवेल उपसा योजनेच्या कामास गती : मंत्री रक्षा खडसेंचे प्रयत्न

Hatnoor water will reach Ozarkheda dam in two days! भुसावळ : वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेवरील ओझरखेडा धरणात हतनूर धरणाचे पाणी दोन दिवसात पोहोचणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आहे. रावेर लोकसभा मतदार संघातील ओझरखेडा धरण यंदा पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यासाठी तसेच सिंचनासाठी पाईप लाईनचे काम त्वरीत पूर्ण करण्यासह लाभक्षेत्रातील शेतकर्यांना तत्काळ सिंचनाचा फायदा मिळवून देण्यासाठी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना 29 जून 2024 रोजी पत्र देवून याबाबत सूचना देत प्रत्यक्ष त्यांच्याशी चर्चा सुध्दा केली आहे.
ओझरखेडा धरणाचे काम पूर्ण
वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनेचे काम 1999 पासून सुरू आहे. ओझरखेडा धरणाचे काम पूर्ण झाले असून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यासाठी हतनूर धरणाच्या जलाशयात जॅकवेल बांधून पावसाळ्यात पाण्याचा उपसा करून लोखंडी पाईपांद्वारे वाहून नेण्यासाठी जॅकवेल व पाईप लाईनचे कामदेखील पूर्ण झाले आहे. ओझरखेडा धरणात काही अंशी क्षमतेने पाणीसाठा होत आहे मात्र सिंचनासाठी पाईप लाईन वितरण प्रणालीचे काम अपूर्ण आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने सदर अपूर्ण कामास चालना मिळणार आहे.
दोन दिवसात सुरू होणार उपसा
आगामी दोन दिवसात हतनूर धरणाच्या जलाशयातून पाण्याचा उपसा सुरू होणार आहे. ओझरखेडा धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठा होऊ शकणार आहे. या योजनेमुळे मुक्ताईनगर, बोदवड व भुसावळ तालुक्यातील 18 हजार 947 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.


