भुसावळातील रवींद्र खरात हत्याकांडातील संशयीताचा जळगाव कारागृहात खून


 

 

जळगाव : राज्यात गाजलेल्या भुसावळातील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्यासह पाच जणांच्या हत्याकांडातील संशयीत आरोपीची जळगाव दुय्यम कारागृहात करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. मोहसीन असगर खान (34, भुसावळ) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. 24 तास पोलिसांचा पहारा असणार्‍या कारागृहात कैद्याचा खून करण्याची हिंमत गुन्हेगारांमध्ये आल्यानंतर आश्चर्य व्यक्त होत आहे. एरव्ही भुसावळात सुरू असलेले गँगवर आता जळगाव कारागृहात पोहोचल्याने यंत्रणेने याबाबत गंभीर दखल घेवून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

पाच जणांची एकाच वेळी झाली होती हत्या
भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात (55) यांची 7 ऑक्टोबर 2019 रोजी भुसावळात अतिशय क्रूर पध्दतीने हत्या करण्यात आली होती. एका टोळक्याने त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या हल्ल्यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांचे बळी गेल्याने राज्यात हे हत्याकांडा गाजले होते. या हत्याकांडातील संशयित आरोपी जळगाव कारागृहात आहेत.

भांडणातून झाली कैद्याची हत्या
भुसावळ हत्याकांडातील आरोपी मोहसीन असगर खान (34) याचा दुसरा संशयित आरोपीसोबत मंगळवारी वाद झाला व त्याचा वचपा काढण्यासाठी दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. या अनुषंगाने रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास मोहसीन असगर खान (34) याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.

कारागृहाच्या कामावर प्रश्नचिन्ह
जेलमध्ये कैद्याचा खून झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कर्तव्यात कसूर करणार्यांवर कारवाई होण्याचे संकेत आहेत. पोलिसांनी जेलकडे धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. या माध्यमातून भुसावळातील गँगवार हे जेलमध्ये देखील पोहोचले आहे.


कॉपी करू नका.