पोर्टल बंदमुळे भुसावळातील 43 शेतकर्‍यांची ज्वारी खरेदी ठप्प

केवळ 31 शेतकर्‍यांच्या 1390 क्विंटल ज्वारीची खरेदी : देयक रखडले


भुसावळ : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी पणन हंगाम अंतर्गत ज्वारी खरेदीसाठी भुसावळ तालुक्यातील 73 शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. यापैकी केवळ 31 शेतकर्‍यांकडील एक हजार 390 क्विंटल ज्वारीची खरेदी झाली आहे. त्या शेतकर्‍यांनाही अद्याप मोबदला दिला गेला नाही तर उर्वरित शेतकर्‍यांची ज्वारी पोर्टल बंद पडल्याने ठप्प झाली आहे. भुसावळ तालुक्यातील 42 शेतकर्‍यांची किमान दोन हजार क्विंटल ज्वारी घरात पडून आहे.

31 शेतकर्‍यांकडील ज्वारीची खरेदी
आधारभुत दराने ज्वारीला तीन हजार 180 रुपये क्विंटलचा दर मिळणार असल्याने यंदा शेतकर्‍यांनी ज्वारीची नोंदणी केली. मुळातच या खरेदी प्रक्रियेला विलंब झाला. यंदा ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट कमी होते. यानंतर हे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले. भुसावळ तालुक्यातील 73 शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. केंद्र सुरू झाल्यानंतर 31 शेतकर्‍यांची एक हजार 390 क्विंटल ज्वारी मोजली गेली. यानंतर पोर्टलमध्ये बदल केल्याने नवीन पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. यामुळे सध्या खरेदी बंद आहे. यामुळे उर्वरित 43 शेतकर्‍यांची खरेदी रखडली असून त्यांची ज्वारी ऐन पावसाळ्यातही घरात पडून आहे. यासोबतच ज्या शेतकर्‍यांची ज्वारी खरेदी झाली. त्यांची नोंद पोर्टलवर झाली नसल्याने त्यांना मिळणारी रक्कमही अडकली आहे. ज्वारीचा वाढीव कोटा पोर्टलमध्ये अपलोड करण्याचे काम सुरू आहे. यामुळे खरेदी प्रक्रिया थांबली आहे मात्र या आठवड्याभरात ही प्रक्रिया पूर्ण होऊन खरेदी पुन्हा सुरू सुरु होईल, अशी माहिती भुसावळ तालुका नोडल एजन्सी असलेल्या खरेदी विक्री संघाने दिली.

मका, हरभर्‍याची नोंदणी नाही
हमी भावाने धान्य विक्री केंद्रात मका व हरभरा या दोन्ही धान्याची एकही शेतकर्‍याने नोंदणी केली नाही. तालुक्यातील सर्व नोंदणीकृत शेतकर्‍यांना केवळ ज्वारीची विक्री करावयाची आहे. रब्बी हंगामातील मका व हरभरा हे धान्य यापूर्वीच शेतकर्‍यांनी विक्री केले आहे. केंद्राला विलंब होत असल्याने शेतकर्‍यांनी मका व हरभरा खुल्या बाजारात विक्री केला आहे.


कॉपी करू नका.