गडचिरोली हादरले : आत्मसमर्पित नक्षलवाद्याची गोळ्या झाडून हत्या


गडचिरोली : भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील आरेवाडा येथे 26 जुलै रोजी पहाटेच्या आत्मसमर्पित नक्षलवाद्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जयराम कोमटी गावडे (40, रा.आरेवाडा, ता.भामरागड) असे मयताचे नाव आहे.

आत्मसमर्पणानंतर वळला शेतीकडे
आठ वर्षांपूर्वी नक्षल्यांची हिंसक चळवळ सोडून जयराम हा गावी शेती करत होता. तो पूर्वी माओवाद्यांसाठी काम करायचा मात्र 2016 मध्ये पत्नीसह आत्मसमर्पण केले. छत्तीसगड सीमेवरील एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथील वांडोली जंगल परिसरात 17 जुलै रोजी पोलिस व माओवाद्यांत चकमक उडाली होती. यात पोलिसांच्या सी- 60 जवानांनी माओवाद्यांना जशास तसे उत्तर दिले होते. यात 12 नक्षलवादी ठार झाले होते तर एक पोलीस अधिकारी व दोन जवान जखमी झाले. यानंतर माओवादी बिथरले असून पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून जयराम गावडे यास अत्यंत निर्दयीपणे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

आत्मसमर्पण हाच पर्याय
गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आरेवाडातील घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे. आत्मसमर्पण हाच माओवाद्यांना एकमेव पर्याय आहे, त्यामुळे त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून अजूनही मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असेही ते म्हणाले.


कॉपी करू नका.