भुसावळ रनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी पावसातही धावून साजरा केला मैत्री दिवस
मित्रांच्या नात्यांसोबत आरोग्य सुदृढतेसाठीचा दिला संदेश
भुसावळ (6 ऑगस्ट 2024) : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी एकत्र धावून मैत्री दिन साजरा केला. धावपटू दर मंगळवार, गुरुवार व रविवार असे आठवड्यातून तीन दिवस एकत्र धावण्याचा सराव करतात. त्याशिवाय हे सर्व पुरुष व महिला धावपटू देशभरातील विविध मॅरेथॉनमध्ये सोबत सहभागी होत असतात. या सर्व धावपटूंमध्ये मैत्रीचे नाते अधिक वृद्धिंगत झाले आहे. हीच मैत्री कायम रहावी या हेतूने रविवारी मैत्री दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला.
मैत्रिणींसाठी आणले फ्रेंडशिप बँण्ड
भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे सदस्य एकत्र हे सर्व धावपटू दहा किलोमीटर अंतर धावले. विशेष म्हणजे यातील काही धावपटूंनी अगदी सुरुवातीपासून ते शेवटच्या अंतरापर्यंत आपल्या मित्राचे हातात हात घेऊन ही धाव पूर्ण केली. जोरात पाऊस सुरू असतानाही धावपटूंनी आपला दृढनिश्चय कायम ठेवून आपले निर्धारित अंतर एकत्रीतरित्या पूर्ण केले. प्रवीण फालक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी वॉर्म अप केले. आरपीडी रस्त्यावर दहा किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिकचे अंतर या धावपटूंनी एकत्र धावायला सुरुवात केली. भर पावसात प्रवीण पाटील यांच्यासोबत सर्व धावपटूंनी स्ट्रेचिंग एक्सरसाइज देखील पूर्ण केली. मैत्रीचे नाते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सर्वच महिला धावपटूंनी आपल्या मैत्रिणींसाठी फ्रेंडशिप बँण्ड आणलेले होते.
पती-पत्नीमधील मैत्रीचे नाते
या उपक्रमात स्वाती व प्रवीण फालक, डॉ.वर्षा व डॉ.सुनील वाडीले, गरिमा व सुयश न्याती, सरला व महेंद्र पाटील, जयश्री व जितेंद्र चौधरी, पुष्पा व संजय तिवारी, पुष्पा व प्रशांत वंजारी या दांपत्यांनी एकत्र धावून पती-पत्नीचे नाते देखील मैत्रीचे असले पाहिजे अशा आपल्या कृतीतून दाखवून दिले. एकमेकांना सुदृढ आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.