भुसावळातील खड्ड्यांमध्ये शिवसेनेने भरवली लांब उडी स्पर्धा

नगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी : बक्षिसाची रक्कम पालिकेला देणार


Shiv Sena organized a long jump competition in the pits of Bhusawal भुसावळ : शहरातील वर्दळीच्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था होवून त्यात मोठ-मोठे खड्डे पडल्यानंतरही पालिका प्रशासन दखल घेत नसल्याने पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी व नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी गुरुवार, 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ लांब उडी स्पर्धा घेण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला मात्र खड्ड्यांची लांबी अधिक असल्याने त्यात विद्यार्थी यश मिळवू न शकल्याने बक्षिसाची रक्कम आता पालिकेला देण्यात येणार आहे. दरम्यान, आंदोलकांनी प्रसंगी पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

खड्डे बुजवण्यासाठी नाही पालिकेकडे निधी
भुसावळ शहरातील वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वीदेखील हीच स्थिती असतानाही पालिकेने दखल घेतली नाही तर पावसामुळे आता रस्त्यावरून चालणेही कठीण आहे. या संदर्भात शिवसेनेने वेळोवेळी निवेदन देवूनही पालिकेने दखल न घेतल्याने गुरुवारी सकाळी 11 वाजता यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ लांब उडी स्पर्धेचे आयोजन केले.

लांब उडीत विद्यार्थी ठरले फेल
लांब उडी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात येणार होती मात्र खड्ड्यांची लांबी अधिक असल्याने विद्यार्थी त्यात जिंकू शकले नाही त्यामुळे ही रक्कम आता पालिकेला सुपूर्द केली जाणार आहे. यावेळी पालिका प्रशासनाचा शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकार्‍यांनी निषेध नोंदवला.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख दीपक धांडे, बबलू बराटे, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, माजी नगरसेवक कैलास लोखंडे, रहिम कुरेशी, सुरज पाटील, मेहमूद शेख, पिंटू भोई, संजू भोई, नरेन लोखंडे, जितू पाटील, पेंटर मनोज पवार आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कॉपी करू नका.