जलंब-शेगाव दरम्यान उद्या रेल्वेचा ब्लॉक : सहा एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावणार !
भुसावळ (9 ऑगस्ट 2024) : भुसावळ विभागातील शेगांव- जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा सुरू करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कामासाठी रेल्वे प्रशासनाने शनिवार, 10 ऑगस्ट विशेष ब्लॉक घेतल्याने लांब पल्याच्या सहा गाड्या विभागातील विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहे.
प्रवाशांची होणार गैरसोय
रेल्वे प्रशासनाकडून शनिवार, 10 रोजी नॉन-इंटरलॉकिंग कामामुळे ब्लॉक घेण्यात आला आहे. याचा लांब पल्याच्या रेल्वे गाड्यांवर थेट परिणाम होणार आहे. भुसावळ विभागातून धावणार्या रेल्वे गाड्या या विभागातील विविध रेल्वे स्थानकावर थांबविण्यात येतील. यात बडनेरा -नासिक विशेष गाडी 40 मिनिटे थांबविली जाईल, हटिया-पुणे एक्सप्रेस ही गाडी एक तास 45 मिनिटे कुठल्या तरी स्थानकावर थांबविणार आहे. गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस एक तास 30 मिनिटे थांबवण्यात येईल तर गांधीधाम-पुरी एक्सप्रेस एक तास 45 मिनिटे व श्री गंगानगर-नांदेड एक्सप्रेस एक तास 10 मिनिटे स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. बडनेरा-भुसावळ मेमू ही गाडी अर्धातास थांबविली जाणार आहे. प्रवाशांनी रेल्वे गाड्या दिरंगाई धावणार असल्याची नोंद घेऊन रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.