बहिणींनो सावत्र भावांपासून सावध रहा ! जळगावात फडणवीसांचा स्पष्ट इशारा
Sisters beware of step brothers! A clear warning from Fadnavis in Jalgaon जळगाव (13 ऑगस्ट 2024) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिन्याला 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला तर काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं. कुणी तुम्ही महिलांना लाच देता का, महिलांना विकत घेताय का अशी भाषा केली. अरे नालायकांनो, तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही. बहिणीच्या प्रेमाचं मोल नसते. आमच्या बहिणी एकवेळ स्वत: जेवणार नाहीत पण भावाला जेवू घालतील. 1500 रुपयात बहिणीचं प्रेम कुणीच विकत घेऊ शकत नाही. हे 1500 रुपये बहिणींना दिलेली भाऊबीज आहे. राज्याची जितकी क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातून बहिणीच्या संसाराला थोडा हातभार लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगत महाविकास आघाडीवर टिकेचा आसूड ओढला.
महाविकास आघाडीवर केली टिका
जळगावात मंगळवारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनिमित्त आयोजित कार्यक्रमात फडणवीसांनी महाविकास आघाडीवर टिकेचे बाण चालवले. ते म्हणाले की, एक जण म्हणाले 1500 रुपयांत काय होते, तुमच्या हातात जेव्हा सत्ता होती तेव्हा फुटकी कवडीही आमच्या माता-भगिनींना दिली नाही. आता आम्ही 1500 रुपये देतोय मग तुमच्या पोटात का दुखतंय?, असे सांगत फडणवीस यांनी सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान रहावे लागेल, असे आवाहन भगिणींना केले.
17 ऑगस्टला पहिला हप्ता खात्यात जमा होणार
एक कोटी 35 लाख अर्ज पात्र ठरले असून 35 लाख अर्ज असे आहेत ज्यांचे आधारकार्ड बँकेशी लिंक नाही. तातडीने जिल्हाधिकार्यांना आधारकार्ड बँकांशी लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 17 ऑगस्टला पहिला हफ्ता दिला जाणार आहे. कुणाच्या खात्यात पैसे नाही आले तर काळजी करू नका. आधारकार्ड लिंक झाल्यानंतर तुम्हाला सप्टेंबरमध्ये तिन्ही महिन्याचे पैसे येतील. खात्यात काही चूक झाली तर पैसे उशिराने येतील परंतु या काळात तुमचे सावत्र भाऊ येतील आणि बघा पैसे दिले नाहीत असं म्हणतील त्यामुळे या सावत्र भावापासून दूर राहा. तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसले आहेत. ते तुम्हाला वंचित राहू देणार नाहीत असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी मविआ नेत्यांना टोला लगावला.