137 कोटी रुपये खर्चाच्या भुसावळातील अमृत योजनेच्या टप्पा दोनला शासकीय मान्यता

आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश : 24 महिन्यात काम पूर्ण करण्याची अट


Administrative approval for Phase II of Amrut Yojana in Bhusawal at a cost of Rs 137 crore  भुसावळ (15 ऑगस्ट 2024) : केंद्र शासनाची महत्वकांक्षी योजना अमृतच्या टप्पा दोनला शासनाकडून मान्यता मिळाली आहे. याबाबतचे आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे यांनी बुधवार, 14 ऑगस्ट रोजी काढले आहे. 136.74 कोटी रुपयांच्या योजनेचे काम 24 महिन्यात पूर्ण करण्याची अट आहे. 1 ऑगस्ट रोजी नगरविकास विभागाच्या बैठकीत अमृत टप्पा दोनच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता शासनाने याबाबत आदेश काढल्यानंतर आता निविदा निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भुसावळकरांना या योजनेच्या माध्यमातून दररोज पाणीपुरवठा होणार आहे. यासाठी जलशुध्दीकरण केद्र, पंपिंग हाऊस, जॅकवेल हे नवीन यंत्रणा तयार केली जाणार आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.

अमृत टप्पा दोनला शासकीय मान्यता
केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजने संदर्भात आमदार संजय सावकारे यांनी या योजनेसाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. यास यश येऊन अखेर यरा योजनेला मूर्त स्वरूप आले आहे. यापूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीत अमृत योजना दोनमध्ये भुसावळ पालिकेचा समावेश नव्हता मात्र तो समावेश केल्यानंतर गुरुवार, 1 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या बैठकीत त्यास अंतीम मंजुरी प्राप्त झाली व हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला. त्यानंतर नगरविकास विभागाने आता अमृत टप्पा दोनच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी केंद्राचे योगदान 45.58 कोटी तर राज्याचे योगदान 70.65 कोटी व पालिकेचे योगदान 20.51 कोटी असणार आहे.

योजनेत अशी होणार कामे
जोगलखेडा येथे विहिर, जॅकवेल, पंपिंग हाऊस बांधण्यात येईल. येथून पाण्याची उचल झाल्यानंतर ट्रामा केअर सेंटरजवळ जलशुध्दीकरण केंद्र निर्माण करून तेथे पाण्यावर प्रक्रियाा होऊन पाणी वितरीत केले जाईल.

10 जलकुंभात पाणी पोहोचणार
शहरात बांधण्यात आलेल्या 10 जलकुंभात जलशुध्दीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी सोडले जाईल, त्या जलकुंभातूनच शहरातील विविध झोनमध्ये नळांद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. ज्या भागात पाईप-लाईन नाही, त्या भागात पाईप लाईन टाकली जाणार आहे. ज्या जलकुंभांना पाईप जोडले नाही, त्यांनाही पाईप-लाईन जोडली जाणार आहे.

प्रयत्नांना आले यश : आमदार संजय सावकारे
अमृतचा टप्पा दोनमध्ये समावेश केल्यानंतर नगरविकास विभागाकडून अंतीम मंजुरी मिळाली व शासनाकडून आता प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने लवकरच निविदा निघून प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार आहे. अमृत योजनेमुळे भविष्यात शहरवासीयांचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे भुसावळचे आमदार संजय सावकारे ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना म्हणाले.


कॉपी करू नका.