भुसावळ शहर कडकडीत बंद : मूक मोर्चात दहा हजार नागरिकांचा सहभाग


Bhusawal city strictly closed: 10,000 citizens participated in the silent march भुसावळ (16 ऑगस्ट 2024) : बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर होणार्‍या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवार, 16 ऑगस्ट रोजी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. सकल हिंदू समाजातर्फे भव्य मूक मोर्चा सकाळी 10 वाजता अष्टभुजा देवी मंदिरापासून काढण्यात आला. जामनेर रोड, ब्राह्मण संघ, मरीमाता मंदिर, लक्ष्मी चौक, सराफ बाजार, गांधी चौक, अमर स्टोअर्स, बाजारपेठ पोलीस स्टेशन, लोखंडी पूल, गुजराथी स्वीट मार्ट, महाराणा प्रताप चौक, गांधी पुतळामार्गे प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

कडकडीत बंद : शाळांना अघोषित सुटी
शहरातील व्यापार्‍यांनी बंदला प्रतिसाद देत शंभर टक्के कडकडीत बंद पाळला तर शहरातील भाजी बाजार, डेलि बाजारही बंद ठेवण्यात आला. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील जवळपास सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या रोडावली. ग्रामीण भागातून एकही वाहन न आल्याने ग्रामीणमधूनही विद्यार्थी आले नाही तर स्थानिक विद्यार्थ्यांनीदेखील शुक्रवारी शाळेत जाणे टाळले मात्र शिक्षक शाळेत उपस्थित होते व त्यांनीही काळ्या फिती लावूनकाम केले. बसस्थानकातही प्रवाशांचा शुकशुकाट दिसून आला तर खाजगी वाहनधारकांनाही बंदचा फटका बसला.

यांचा मूक मोर्चात सहभाग
मोर्चात बक्षो गुरुदासराम जग्यासी, स्वामी ब्रह्मानंद (दत्त गिरणारी मठ), रासयात्रादास (इस्कॉन), श्री धर्मस्वरूप स्वामीजी शास्त्री, हभप धनराज महाराज अंजाळेकर, श्री प्रभाकर शास्त्री (चक्रधर मंदिर), गोटू गोरवाडकर गुरुजी, अमृत रामदास जग्यासी, बालयोगी महामंडलेश्वर गेंदालाल बाबा, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, अर्जुनसिंगजी महाराज, माधवस्वामी शास्त्री, भक्तीश्रीजी महाराज, भंते यांच्यासह विविध सांप्रदायांचे धर्मगुरू साधुसंत, व्यापारी, सराफ असोसिएशन, हॉटेल चालक, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम व्यवसायीक, युवक- युवती, श्री गणेश व नवदुर्गा मंडळाचे कार्यकर्ते, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले.

कठोर कायद्याची मागणी : प्रांतांना निवेदन
मूक मोर्चा प्रांत कार्यालयात पोहोचल्यानंतर निषेध मोर्चाचे लेखी निवेदन या मोर्चाचे नेतृत्व करणारे सर्व साधू संत धर्मगुरू, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष यांच्याहस्ते प्रांताधिकारी कार्यालयात देण्यात आले. या निवेदनात बांगलादेशात अल्पसंख्यांक समुदायावर प्रचंड अत्याचार होत असल्याने त्यांच्या सुरक्षेतेसाठी ताबडतोब पाऊले उचलावी, भयावह स्थिती व असुरक्षित वातावरणामुळे जीव वाचवण्यासाठी भारताच्या सीमेजवळ जमा झालेल्या बांगलादेशातील अल्पसंख्याकांसाठी छावण्या सुरू कराव्यात तसेच कठोर कायदा करून भारतातही उपद्रव माजवणार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.


कॉपी करू नका.