बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा प्रताप : तलवारीने केक कापून आपल्या पत्नीसह मुलाला भरवला

Pratap of Buldhana MLA Sanjay Gaikwad: Cut the cake with a sword and fed it to his wife and son बुलढाणा (17 ऑगस्ट 2024) : 2021 मध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर चर्चेत आलेल्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक नवीन प्रताप समोर आला आहे. तलवारीने केक कापून आपल्या पत्नी व मुलाला भरवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाल्यानंतर गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाकरे गटाने त्यांच्या या कृतीवर आक्षेप घेत त्यांचा उल्लेख मस्तवाल आमदार म्हणून केला आहे. ज्या राज्यात स्वतः गृहमंत्रीच ठोकून काढण्याची भाषा करतात, त्या राज्यात आमदाराने हा माज दाखवणे स्वाभाविकच आहे, असे ठाकरे गटाने या प्रकरणी म्हणत खळबळ उडवून दिली आहे.
तलवारीने केक कापल्याने वाढली अडचणी
आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा कुणाल याचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा झाला. यावेळी केक कापण्यासाठी तलवारीचा वापर करण्यात आला व तलवारीने केक कापून तो त्यांनी आपल्या लाडक्या मुलासह पत्नीला भरवला. यावेळी त्यांच्या समर्थनार्थ मोठी घोषणाबाजी करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
हे तर मस्तवाल आमदार : सुषमा अंधारे यांची टीका
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी गायकवाड यांचा उल्लेख मस्तवाल आमदार म्हणून केला आहे. ज्या राज्यामध्ये सत्ताधार्यांचे आमदार रोज पोलिसांना नव्या नव्या धमक्या देतात… ज्या राज्यात स्वतः गृहमंत्रीच ठोकून काढण्याची भाषा करतात… ज्या राज्यात मुख्यमंत्रीच दंगलीस कारणीभूत असणार्या व्यक्तीच्या पाठीशी मी ठामपणे उभे राहतात… त्या राज्यात आमदाराने हा माज दाखवणे स्वाभाविक आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.


