मुसळधार पावसात वीज कोसळली : पिंप्राळ्यात शेतकर्याचा तर शिंगाडीत शेतमजूर महिलेचा मृत्यू
पावसाने पुन्हा पिकांवर संकट : मुक्ताईनगर तालुक्यात मोठे नुकसान
कुर्हा/खिर्डी (19 ऑगस्ट 2024) : पावसासोबत विजांचा कडकडाट सुरू झाल्यानंतर अचानक वीज कोसळल्याने मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळ्यात शेतकर्याचा तर रावेर तालुक्यातील शिंगाडीत शेतमजूर महिलेचा मृत्यू झाला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या दोन्ही घटनानंतर संबंधित गावात शोककळा पसरली आहे. पावसामुळे मुक्ताईनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्यांवर पुन्हा संकट कोसळले आहे.
पिंप्राळ्यात तरुण शेतकर्याचा मृत्यू
कुर्हाकाकोडा : येथून जवळच असलेल्या पिंप्राळा गावातील 22 वर्षीय तरुण शेतकरी ईश्वर शांताराम सुशीर याच्या अंगावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवार, 18 रोजी अडीच वाजेच्या सुमारास पिंप्राळा शेत-शिवारात घडली. स्वतःच्या शेतात हा तरुण आई-वडिलांसह निंदणीचे काम करत होता. अचानक दुपारी वातावरण बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. जोराची विज कडाडून शेतात असलेल्या ईश्वर सुशीर याच्या अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी कुटुंबीयांनी दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ईश्वरच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. तरुण शेतकर्याच्या मृत्यूने पिंप्राळा गावावर शोककळा ओढवली आहे.
शिंगाडी येथे शेतमजूर महिलेचा मृत्यू
खिर्डी : येथून जवळच असलेल्या शिंगाडी शेतशिवारात शेती कामासाठी गेलेल्या शेतमजूर महिलेच्या अंगावर वीज पडल्याने तिचा मृत्यू ओढवला. जुलेखा हैदर फकिर (35, शिंगाडी, ता.रावेर) ही घटना रविवार, 18 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत जब्बार शाह लाल शाह फकीर (रा.फेकरी, ता.भुसावळ) यांच्या खबरीनुसार निंभोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शिंगाडी गावातील महिलांसोबत जुलेखा ही शेतमजूर महिला शिंगाडी शिवारात शैलेंद्र सोपान पाटील यांनी केलेल्या शेत गट नंबर 151 या शेतात कामासाठी गेल्या असता पावसाचे वातावरण होवून विजांचा कडकडाट सुरू झाला व वीज कोसळताच महिलेचा मृत्यू झाला. यावेळी अन्य महिला सुदैवाने बचावल्या. रावेर ग्रामीण रुग्णालयात मृतदेह हलवण्यात आला. तपास निंभोरा पोलिस स्टेशनचे सहा.निरीक्षक हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली रिजवान पिंजारी करीत आहे.