तापीच्या बॅक वॉटरमध्ये बोट उलटली : सात जणांना जलसमाधी
उच्छल : होळीच्या सुटीनिमित्त पर्यटनासाठी आलेल्या गुजरातमधील उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील कुटुंबासह सात जणांना तापी पात्रात जलसमाधी मिळाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. सूत्रांच्या माहितीनुसार, वेगाने वाहत असलेल्या वार्यामुळे भिंतखुद गावाजवळील नदीपात्रात बोट अनियंत्रीत होवून उलटली. मयतांमध्ये लहान मुलांसह स्त्री व पुरूष मिळून सात जणांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाचा शोध घेण्यात आला मात्र अंधारामुळे अडचणी आल्या तर बुधवारी पुन्हा शोध कार्य राबवण्यात आले. दरम्यान, बोट उलटल्यानंतर नागरीकांनी प्राण वाचवण्यासाठी आरडा-ओरड केल्याने स्थानिक मासेमारांनी नदीपात्रात उड्या घेतल्याने सहा जणांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले.






