मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा एक दिवस पुढे ढकलला
धुळ्यात रोड शो तर दोंडाईचासह नंदुरबारला 22 रोजी तर भुसावळात 23 रोजी होणार सभा
भुसावळ : माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराने झालेले निधन व राज्याला बसलेला अतिवृष्टीचा तडाख्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा स्थगित करण्यात आली होती मात्र नंतर 21 रोजी पुन्हा धुळे येथून यात्रेला सुरूवात होणार असलीतरी एक दिवस मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याने आता 22 रोजी धुळ्यातून महाजनादेश यात्रेला सुरुवात होणार आहे. धुळ्यात विमानाने मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर दुपारी साडेचारला रोड शो, सायंकाळी सात वाजता दोंडाईचा येथे जाहीर सभा व नंतर रात्री साडेआठ वाजता नंदुरबार येथे जाहीर सभा होणार आहे.
भुसावळातील सभा 22 ऐवजी आता 23 रोजी
दुसर्या दिवशी 23 रोजी सकाळी 10 वाजता धुळ्यात पत्रकार परीषद झाल्यानंतर अमळनेर येथे सकाळी 11.30 वाजता महाजनादेश यात्रेचे स्वागत होईल त्यानंतर 12.30 वाजता धरणगावात स्वागत, दुपारी दिड वाजता सागर पार्कच्या मैदानावर जाहीर सभा व त्यानंतर दुपारी तीन वाजता जामनेरला सभा व सायंकाळी पाच वाजता भुसावळातील डी.एस.हायस्कूलच्या प्रांगणावर जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर 24 रोजी बोदवड, किन्हीमार्गे नांदुरा, खामगाव, शेगावकडे यात्रेचे प्रयाण होईल. रविवार, 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सोलापूरात अखेरची सभा होवून महाजनादेश यात्रेचा समारोप होणार आहे.
नाथाभाऊंच्या मतदारसंघात सभा नाहीच
आधीच्या दौर्यात व दुसर्यांदा बदललेल्या दौर्यात माजी महसूलमंत्री मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर मतदारसंघात सभा टाळण्यात आली आहे. खडसेंच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची सभा होणार नसल्याने राजकीय वर्तुळात या विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.