अविवाहित तरुणांची लग्नांच्या आमिषाने फसवणूक करणारी परप्रांतीय टोळी धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांच्या जाळ्यात

धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांची कामगिरी ः दुचाकीसह 25 हजारांची रोकड जप्त


Chalisgaon road police in Dhule has caught a migrant gang cheating unmarried youths with the lure of marriage. धुळे (3 सप्टेंबर 2024) : लग्नाच्या आमिषाने अविवाहित तरुणांशी संपर्क साधून त्यांना गंडा घालणार्‍या परप्रांतीय टोळीला धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलिसांनी आठ दिवस परराज्यात पाठलाग करीत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींनी अनेकांना गंडा घातल्याचा यंत्रणेला संशय असून लग्न जमवून देणारे एजंटही आता पोलिसांच्या रडारवर आहेत. आरोपींच्या ताब्यातून 25 हजारांची रोकड तसेच दुचाकी पोलिसांनी जप्त केली.

धुळ्यातील तरुणास घातला होता तीन लाखांचा गंडा
चाळीसगाव रोड भागातील ज्ञानेश्वर रोहीदास चौधरी (32) या अविवाहित युवकासाठी एजंट जलनसिंग प्रेमसिंग मोरे याने स्थळ सूचवत मुलीचे मोबाईलवर फोटो पाठवले. एक मुलगी पसंत पडल्यानंतर मध्यप्रदेशच्या पानसेमल येथे 20 ऑगस्ट रोजी मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला व मुलगी पसंत पडली मात्र 22 रोजी एजंट मोरे याने मुलीसाठी अन्य स्थळ आल्याचे सांगून हे स्थळ हवे असल्यास तीन लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट घातली व ती मान्य करीत पैसे देण्यात आले.त्यानंतर 23 ऑगस्ट रोजी तरुण व त्याचे नातेवाईक असे लग्नासाठी पानसेमल, मध्यप्रदेश येथे गेले. बिजासनी माता मंदिर, मध्यप्रदेश येथे हिंदू रितीरिवाजानुसार दोन्ही कुटुंबांच्या समोर विवाह झाल्यानंतर विवाहितेसह तिची आई व परिवार धुळ्याकडे येत असताना सोनगीर येथे हॉटेल स्वागतमध्ये जेवणासाठी थांबले. त्यानंतर बनावट नवरी व तिची आई यांनी वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने अज्ञातासोबत दुचाकीवरून पळ काढला. याप्रकरणी 25 ऑगस्ट रोजी चाळीसगाव रोड पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आठ दिवसांच्या पाठलागानंतर टोळी जाळ्यात
चाळीसगाव रोड पोलिसांनी तांत्रिक बाबींचा तपास करून आरोपींचा ठिकाणा शोधला मात्र आरोपी सातत्याने आपले राहण्याचे ठिकाण बदलत होते मात्र पोलिसांनी त्यांचा आठ दिवस पिच्छा पुरवत त्यांच्या अखेर मुसक्या आवळल्या. अटकेतील आरोपींमध्ये बनावट नवर्‍या मुलीचा भाऊ सुनील पदमसिंग चव्हाण (27, दुधखेडा, ता.शहादा, जि.नंदुरबार), एजंट नसीम मुजफ्फर खान पठाण (28, गरीब नवाज कॉलनी, शहादा), बनावट नवरीची आई भागाबाई बळीराम गवळी (48, रायसिंगपूरा, नंदुरबार), बनावट मामा नादरसिंग उर्फ महाराज मंटूसिंग रावत पावरा (बनावट नवरी मुलीचा मामा) यांना पोलिसांनी अटक तर बनावट नवरी बनलेल्या अल्पवयीन बालिकेला ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून 25 हजारांची रोकड तसेच दुचाकी एम.एच.39 ए.एच 4480 जप्त करण्यात आली.

बनावट नातेवाईक व एजंट पोलिसांच्या रडारवर
या गुन्ह्यात बनावट आजी साईबाई बादर्‍या पावरा (मानमोडया, ता.शहादा), बनावट नातेवाईक संजय रामा भील (दुधखेडा, ता.शहादा) व एजंट जलनसिंग प्रेमसिंग मोरे (रा.नांदया, ता.शहादा) यांचा सहभाग समोर आला असून त्यांचा कसून शोध सुरू आहे. तपास चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे फौजदार शरद व्ही.लेंडे करीत आहेत.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा.पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक हरीशचंद्र पाटील, हवालदार सुनील एस.पाथरवट, अविनाश वाघ, संजय धनगर, शोएब बेग, अतीक शेख, सिराज खाटीक, सारंग शिंदे, सचिन पाटील, विनोद पाठक, मनोज भामरे, संदीप वाघ, माधुरी हटकर आदींच्या पथकाने उघडकीस आणला.


कॉपी करू नका.