कट्टर समर्थक दिलीप खोडपेंचा भाजपाला ‘जय श्रीराम’ : जामनेरातून गिरीश महाजनांविरोधात लढणार !

0

जामनेर (16 सप्टेंबर 2024) : भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा मराठा समाजातील मातब्बर व्यक्तीमत्व मानले जाणारे दिलीप खोडपे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजेच शरद पवार यांच्या गटात प्रवेश करुन दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्याविरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

महाजनांना शह देण्यासाठी शोधला उमेदवार
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मैदानात उतरले असून महाराष्ट्र पिंजून काढत भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीविरोधात डावपेच आखत आहेत. अशातच आता शरद पवार यांनी भाजपचे नेते, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना शह देण्यासाठी तगडा उमेदवार शोधला आहे.

खोडपे करणार शरद पवार गटात प्रवेश
मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात त्यांना कुणाचेही आव्हान नसल्याचे चित्र होते. कारण काही महिन्यांपूर्वी महाजन यांचे कट्टर विरोधक संजय गरूड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महाजन यांचा एकतर्फी विजय होईल असे सर्वांचे मत होते मात्र अशातच आता गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक असलेले दिलीप खोडपे यांनी भाजपचा राजीनामा दिला असून ते लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

21 रोजी तुतारी हाती घेण्याची शक्यता
खोडपे हे गिरीश महाजन यांच्या विरोधात जामनेर विधानसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शरदचंद्र पवार पक्षाची सुरूअसलेली शिवस्वराज्य यात्रा 21 तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे. याच शिवस्वराज्य यात्रेदरम्यान खोडपे हे तुतारी हाती घेऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. स्वतः शरद पवार या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळात जळगावमध्ये तुतारी विरुद्ध कमळ असा हायहोल्टेज सामना होण्याची चिन्हे दिसत आहे.

कोण आहेत दिलीप खोडपे?
दरम्यान, दिलीप खोडपे हे जळगावमधील भारतीय जनता पक्षाचे बडे नेते मानले जातात. ते जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष खोडपे यांची जळगाव जिल्ह्यात मराठा नेता म्हणुन ओळख आहे. एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल 1 लाख 40 हजार मते आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी गिरीश महाजनांविरोधात मराठा कार्ड खेळण्याची रणनिती आखल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

 


कॉपी करू नका.