एक लाखांची लाच भोवली : पारोळा पंचायत समितीच्या ग्रामविस्तार अधिकार्‍यासह दोघे जाळ्यात

बीडीओेंच्याही वाढल्या अडचणी : लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ


Bribe of one lakh: Parola Panchayat Samiti village development officer and two in the net पारोळा : 60 लाख रुपये खर्चाच्या विकासकामांची वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी पारोळा गटविकास अधिकार्‍यांच्या नावाने दोन टक्के व स्वतःसाठी एक टक्के प्रमाणे एक लाख 80 हजारांची लाच मागून तडजोडीअंती एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पारोळा पंचायत समितीतील ग्रामविस्तार अधिकारी सुनील अमृत पाटील (58) व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार (28) यांना पारोळा पंचायत समितीतील कार्यालयातच जळगाव एसीबीने रंगेहाथ अटक केली. या कारवाईने पारोळा पंचायत समितीतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. या कारवाईनंतर पारोळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांच्यादेखील अडचणी वाढल्या असून त्यांनाही आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

असे आहे लाच प्रकरण
धूळपिंप्री, ता.पारोळा येथील 25 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते सरपंच यांचे चिरंजीव आहेत व गावातील ग्रामपंचायतीत महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत काँक्रिटीकरण व पेव्हर ब्लॉकची एकूण प्रत्येकी 15 लाखांप्रमाणे चार कामे मंजूर झाली आहे. या कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी आरोपी कल्पेश बेलदार यांनी बीडीओ यांच्या नावाने दोन टक्के व स्वतःसाठी एक टक्के प्रमाणे एक लाख 80 हजार रुपयांची लाच 10, 12, 16 व 19 सप्टेंबर रोजी मागितली. तक्रारदाराने 10 सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर वेळोवेळी लाच पडताळणी करण्यात आली. पडताळणीत आरोपी सुनील पाटील यांनी लाचेला प्रोत्साहन दिले व शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पंचायत समितीत आरोपी कल्पेश बेलदार याने तडजोडीअंती एक लाखांची लाच बीडीओ यांच्यासाठी मागून ती स्वीकारली.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, हवालदार सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, सचिन चाटे, हवालदार सुनील वानखेडे, नाईक किशोर महाजन, नाईक बाळू मराठे आदींच्या पथकाने यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !