धुळे हादरले : एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले
Dhule shook: Dead bodies of four members of the same family were found धुळे (19 सप्टेंबर 2024) : धुळ्यातील एकाच कुटूंबातील चौघांचे मृतदेह आढळल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात ही घटना घडली. दरम्यान ही घटना आत्महत्या की घातपात ? याबाबत पोलिसांकडून अधिक माहिती घेतली जात आहे.
विषारी औषध प्राशन केल्याचा अंदाज
धुळ्याच्या देवपूर भागातील प्रमोद नगरात सेक्टर क्रमांक दोनमध्ये प्रवीण गिरासे यांचे कुटूंबियांसह वास्तव्य होते व पारोळा रस्त्यावरील मुंदडा मार्केटमधील व्यापारी संकुलात गिरासे यांचे कामधेनू ग्रो या नावाचे दुकान आहे मात्र या कुटूंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे कारण अस्पष्ट आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवीण गिरासे (52) यांनी गळफास घेतला तर गीता प्रवीण गिरासे (47) व मुलं गीतेश प्रवीण गिरासे (14), सोहम प्रवीण गिरासे (18) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
अशी उघडकीस आली घटना
प्रवीण यांचे दोन दिवसांपूर्वीच त्यांची बहिण संगीता राजपूत यांच्याशी बोलणे झाले व ते मुलाच्या शैक्षणिक कामानिमित्त पुणे येथे जाणार होते. यामुळे संगीता यांचा दोन दिवसांपासून प्रवीण यांच्याशी संपर्क नव्हता. त्यानंतर संगीता यांनी प्रवीण यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता उत्तर न मिळाल्याने संगीता यांनी गिरासे कुटूंबातील इतर सदस्यांशी संपर्क केला परंतु प्रतिसाद न मिळाल्याने संगीता राजपूत गुरुवारी सकाळी प्रवीण गिरासे यांच्या घरी गेल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.