भुसावळातील पु.ओं.नाहाटा महाविद्यालयाचे रासेयो शिबिर दत्तक गाव किन्ही येथे उत्साहात

भुसावळ (26 सप्टेंबर 2024) : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे दत्तक गाव किन्ही येथे ‘स्वच्छता ही सेवा आणि महिला सशक्तिकरण’ या उपक्रमांतर्गत एक दिवसीय शिबिर झाले. भारतीय संस्कृतीत महिलांना स्मशानभूमीत प्रवेश दिला जात नाही, अशा अंधश्रद्धा व प्रथांना मोडीत काढण्यासाठी गावातील स्मशानभूमीची साफसफाई रासेयो स्वयंसेवकांमार्फत करण्यात आली. सरपंच सोनवणे यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवला.
गाव झाले चकाचक
गावात साफसफाई करून कचरा संकलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व आणि ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या विषयावर सामाजिक प्रबोधन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे अध्यक्षस्थानी होते. सर्वोदय हायस्कूलचे मुख्याध्यापक एम.एम.चौधरी प्रमुख पाहुणे होते. प्रमुख वक्ते प्रा.पी. ए.अहिरे यांनी स्वच्छता ही सेवा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
माजी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर यांनी एन.एस.एस.स्थापना दिवस आणि महात्मा गांधीजी यांचे योगदान या विषयावर प्रकाश टाकला. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे यांनी महाविद्यालयीन जीवनात एन.एस.एस.मुळे विद्यार्थी सामाजिकदृष्ट्या सुज्ञान होतात आणि राष्ट्र निर्मितीसाठी हातभार लावतात, असे ते म्हणाले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.विलास महिरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ.साहेबराव राठोड, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.संगीता भिरूड आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
