मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण सरकारने द्यावे ; ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध कायम राहणार ! : अॅड.प्रकाश आंबेडकर
बाळासाहेब उवाच : आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित सर्व जागांवर लढणार ! वन इलेक्शन ही देशाला तोडणारी भूमिका
भुसावळ (01 ऑक्टोबर 2024) : मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध नाही मात्र ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देवू नये, अशी आपली स्पष्ट भूमिका आहे व तसे झाल्यास वेळप्रसंगी वंचित रस्त्यावर उतरेल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी भुसावळात दिला. चोपडा येथे सोमवारी होत असलेल्या आदिवासी सत्ता परिवर्तन परिषदेसाठी अॅड.आंबेकडर जिल्हा दौर्यावर आल्यानंतर त्यांनी भुसावळातील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला.
कोकणातील पुतळा पाडल्याचा व्यक्त केला संशय
अॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कोकणातील राजकोटमधील शिवरायांचा पुतळा पडला म्हणण्याऐवजी तो पाडण्यात आला, असा आपला संशय असून चौकशी यंत्रणांनी याबाबत सखोल चौकशी करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, राज्यभरात आम्ही मातीच्या जागेवर छत्रपती शिवरायांचे पुतळे उभे केलेले पाहिले. ऊन, वारा व पावसात या पुतळ्यांना कुठलीही हानी झाली नाही मात्र कोकणात राजकोटमध्ये उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा ब्रांझ धातूचा पाडण्यात आला, असा आपला संशय असून तो कुणी व का पाडला ? याबाबत यंत्रणांनी चौकशी केल्यास निश्चित सत्य समोर येईल, असा दावा त्यांनी केला.
ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध
अॅड.आंबेडकर म्हणाले की, जरांगे पाटील यांच्या मागणीकडे शासनाने लक्ष दिले नाही त्यामुळे आरक्षण कळीचा मुद्दा बनला आहे. जरांगे पाटलांनी ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे मात्र ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये, अशी भूमिका आपण घेतली असून वेळप्रसंगी त्यासाठी आंदोलनही छेडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ओबीसींचे आरक्षण ओबीसीलाच राहिले पाहिजे त्यामध्ये इतर कोणत्याही समाजाला समाविष्ट करता कामा नये सरकारला जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे. अशी वंचित बहुजन आघाडीची भूमिका असेल, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.
आगामी निवडणुका आरक्षणाभोवती
बेरोजगारी, महागाई, आधारभूत किंमती हे सर्व कळीचे मुद्दे मागे पडत चालले असून आघाड्यांचे राजकारण कायमच सुरू राहणार आहे. वंचित मात्र आरक्षण वाचवण्याचे धोरण स्वीकारणार आहे. ज्यांना आरक्षण दिले ते एका बाजूला व आरक्षण संपले ते एका बाजूला असतील, असे चित्र पहायला मिळेल, असेही ते म्हणाले. शरद पवारांनी रत्नागिरीत जरांगे पाटील यांच्या मागणीला समर्थन दिल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे एनसीपीची तीच भूमिका आहे हे यातून स्पष्ट होते, असे ते म्हणाले. आरक्षण कायमचे संपले पाहिजे याच मताचे काँग्रेस, एनसीपी, उबाठा व भाजपा पक्ष आहे,त असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला.
एनसीपीवर टीका : शरद पवारांवर नाही
लोकसभा निवडणुकीत वंचितने काही जागांवर बिनशर्त पाठिंबा दिला. त्यात सुप्रीया सुळेंनाही बारामतीत पाठिंबा देण्यात आला मात्र एकीकडे पवारांवर टीका व दुसरीकडे पाठिंबा सा काय ? असा प्रश्न विचारला असता अॅड.आंबेडकर यांनी शरद पवार व एनसीपी वेगवेगळे असल्याचे विधान केले. आपण नेहमीच शरद पवारांवर नाही तर एनसीपी विरोधात बोलतो, असे ते म्हणाले. शाहु महाराजांचा पराभव न होण्यासाठी पाठिंबा दिला तसेच सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती प्रेस्टीज असल्याने त्यांच्या विनंतीला मान दिला, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
वन इलेक्शन ही देशाला तोडणारी भूमिका
वन नेशन वन इलेक्शन ही देशाला तोडणारी भूमिका आहे. हे देशाच्या हिताचे नाही त्यामुळे एकात्मतेला बाधा असून आरएसएस व भाजपाने हे लोकांवर लादायचे ठरवले असल्याचे ते म्हणाले. आमदार नितेश राणेंना भाजपा सरकारचा पाठिंबा असल्यानेच ते बेताल व प्रक्षोभक वक्तव्य करतात. राज्यात 32 ठिकाणी दंगली झाल्या मात्र जनता या प्रकाराला कंटाळली असून दंगली करण्याच्या मुडमध्ये जनता नाही.
कपडे फाडणार्या सरकारचे स्वागत करायला हवे
लाडकी बहिण योजनेतील श्रेयवादाबाबत अॅड.आंबेडकर म्हणाले की, लाडकी बहिण पाठीमागे राहिल्याने शिवाजी महाराज पुढे आले. सरकार एकमेकांचे कपडे फाडत असल्याने आपण त्यांचे स्वागत करायला हवे, असेही ते म्हणाले. राज्यातील काही आयपीएस अधिकार्यांनी विश्वासार्हता धोक्यात आणल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, अधिकार्याने कायद्याला धरून न्यूट्रल काम करायला हवे. वंचित आगामी निवडणुकीत सर्व जागांवर लढणार असून भुसावळचा उमेदवार लवकरच जाहीर करू, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला वंचितच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.