डांभूर्णी येथे बिबट्याने पाडला गोर्ह्याचा फडशा

डांभूर्णी (03 ऑक्टोबर 2024) : ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गावठाण भागात मोरेश्वर रमेश कोळी यांच्या खळ्यात गुरे बांधण्यात आल्यानंतर नुकताच तीन वर्षीय गोर्ह्याचा बिबट्याने फडशा पाडला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाला माहिती दिली.
वनक्षेत्रपाल विपुल पाटील व सहकारी दीपक चव्हाण, चेतन शेलार, योगेश मुंडे, अजिंक्य बाभुळकर नागपूर, किरण पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.सी.भगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली किनगाव येथील सहकारी प्रशांत दुसाने यांनी उपस्थित देत पंचनामा करण्यात आला. बिबट्यानेच ही शिकार केल्याचा अंदाज आहे. शेतकर्यांनी आपल्या प्राण्यांची सुरक्षा करण्याबाबत वनपाल विपूल पाटील यांनी मार्गदर्शन केले. बिबट्याचा वावर या परिसरात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. या घटनेत शेतकर्याचे सुमारे 15 हजारांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी ग्रामस्थ व पशुपालक मोरेश्वर कोळी यांनी केली आहे.