महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला : बंडखोरी टाळण्यासाठी उशिराने जाहीर होणार यादी !


The formula for allotment of seats in the Grand Alliance was decided : the list will be announced late to avoid rebellion! मुंबई (03 ऑक्टोबर 2024) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती घेवून जवळपास नावांची निश्चित केली आहे मात्र महायुतीत बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाकडून उशिराने उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप 160 जागा तर उरलेल्या 128 पैकी शिंदे सेनेला 80 व राष्ट्रवादी अजित दादा गटाला 48 जागा मिळतील.

भाजपाला बंडखोरी होण्याची भीती
भाजपमध्येही छुपी बंडखोरी होण्याची दाट शक्यता असल्याने व आतून होणारा विरोध लक्षात घेता कोणती जागा, कोणत्या पक्षाला सुटली हे जाहीर केले जाणार नाही. कारण ते माहिती झाल्यास बाहेरून आलेले बंडखोरी करीत इतर पक्षात जाऊ शकतात म्हणून आचारसंहिता जाहीर झाली तरी यादी जाहीर करण्याची घाई महायुती करणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपने 150 ते 160 जागा लढवल्यास 90 ते 95 जागा निवडून येऊ शकतात, असा प्राथमिक अहवाल आहे.

भाजपाच्या जागा घटल्या
पूर्वी भाजप आणि सेनेतच जागावाटप असल्याने जास्त जागा वाट्याला यायच्या मात्र आता अजितदादा गट आणि मित्रपक्षही सोबत असल्याने जागा कमी झाल्या आहे. 2019 मध्ये भाजपने 164 जागा लढवल्या होत्या. त्यांचे 105 उमेदवार निवडून आले होते. शिवसेनेने 124 जागा लढवल्या होत्या. त्यांचे 56 निवडून आले. राष्ट्रवादीने 121 लढवून त्यांचे 54 आणि काँग्रेसने 147 जागा लढवून 44 उमेदवार निवडून आले.

या वेळी किमान 150 जागा लढवल्या तरच भाजपला काही भविष्य राहील. त्यामुळे किमान 150 च्या खाली भाजप येणार नाही. भाजपत बाहेरून आलेले अनेक मातब्बर तिकिटाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यांना सांभाळताना पक्ष नेतृत्चाच्या नाकी नऊ येण्याची शक्यता जास्त आहे. मात्र सर्वांनाच सामावून घेणेही शक्य नसल्याने शक्यतोवर कोणती जागा महायुतीतील कोणत्या पक्षाला सुटली हे जाहीर न करण्याचे ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. परिणामी बंडखोरी काही प्रमाणात थांबवता येईल असा विचार यामागे आहे. दरम्यान, दुसरीकडे महाविकास आघाडीचे जागावाटपही लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


कॉपी करू नका.