धुळे तालुका पोलिसांची मोठी कारवाई : चोरीच्या 18 मोबाईलसह मालेगावातील चोरट्यांना बेड्या
Big action by Dhule taluka police: Thieves in Malegaon with 18 stolen mobiles in chains धुळे (10 ऑक्टोबर 2024) : धुळे तालुका पोलिसांनी मालेगावातील कुविख्यात मोबाईल चोरट्यांना अटक करीत त्यांच्याकडून गुन्ह्यातील दुचाकी व 18 चोरीचे मोबाईल जप्त केले. नुर मोहम्मद ईस्तेयात अहमद (22) व मोहम्मद मुदतसीर खालीकुदजमा (21, दोन्ही रा.हाजी मुस्तफा चौक, रमजानपुरा, मालेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
अनेक गुन्हे उघडकीस येणार
तक्रारदार अजय सखाराम गवळी (21, लळिंग) हे 8 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 9.30 वाजता मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील रोकडे हनुमान मंदिरात श्री हनुमानाचे दर्शनास गेल्यानंतर मोबाईलवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी धूम स्टाईल मोबाईल लांबवला होता. याबाबत धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल होता. धुळे तालुका पोलिसांना मालेगावातील आरोपींची माहिती मिळताच त्यांच्या मुसक्या बांधण्यात आल्या. आरोपींकडून गुन्ह्यातील दुचाकी व एक लाख 35 हजार रुपये किंमतीचे 18 मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपी सराईत असून त्यांच्याविरोधात यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक विजय पाटील, हवालदार नितीन चव्हाण, चेतन कंखरे, निलेश पाटील, कुणाल शिंगाणे, रवींद्र सोनवणे, राकेश मोरे, महेंद्र गिरासे, राहुल देवरे आदींच्या पथकाने केली.