दीपनगरात लोखंड चोरीसाठी रुग्णवाहिकेचा वापर : चालकाला रंगेहाथ अटक


Use of ambulance for iron theft in Deepnagar : Driver arrested red-handed भुसावळ (13 ऑक्टोबर 2024) : सुरक्षा रक्षकांचा खडा पहारा असलेल्या दीपनगरातील नवीन 660 मेगावॉट प्रकल्पात भुसावळ भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या रुग्णवाहिकेवरील चालकाने सुमारे 13 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरले व रुग्णवाहिकेतून हे साहित्य नेताना सुरक्षा रक्षकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. ही धक्कादायक घटना शनिवार, 12 रोजी दुपारी एक वाजता घडली. शशिकांत भागवत चौधरी (41, फुलगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

अशी घडली घटना
दीपनगरातील नवीन 660 मेगावॉट प्रकल्पातून भेल कंपनीच्या मालकीची फायबर टाकी, लोखंडी अँगल, नटबोल्डतसेच अन्य लोखंडी साहित्य मिळून 12 हजार 960 रुपयांचे साहित्य संशयीत शशिकांत चौधरी हा रुग्णवाहिका (क्रमांक एम.एच.15 जी.व्ही.6716) या वाहनातून नेत असताना शनिवारी दुपारी एक वाजता एम.एस.एफ. सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रवीण खैरे, रोहिदास महाजन, विनोद पवार, प्रवीण पाटील यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेची तपासणी करून खातरजमा केली व भुसावळ तालुका पोलीस प्रशासनाला सूचित केले. 12 हजार 960 रुपयांचे साहित्य व लाखो रुपयांची रुग्णवाहिका पोलिसांनी जप्त करीत चालकाला अटक केली. भुसावळ तालुका पोलिसात एम.एस.एफ चे जवान प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरून शशिकांत भागवत चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस उपनिरीक्षक मंगेश दराडे करीत आहे.

भाजपा तालुकाध्यक्षांची रुग्णवाहिका
भुसावळ भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्या मालकिची रुग्णवाहिका कंत्राटी तत्वावर दीपनगरात लावण्यात आली आहे मात्र रुग्णवाहिकेवरील चालकालाच भंगार चोरी प्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर भुसावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.


कॉपी करू नका.