महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटला ! : असा आहे फार्म्युला


मुंबई (22 ऑक्टोबर 2024) : महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाढलेल्या सुंदोपसुंदीनंतर तिढा सोडवण्यात नेत्यांना यश आले आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 100 ते 105 जागांवर, शिवसेना 96 ते 100 जागांवर, तर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 80 ते 85 जागांवर निवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे. मुंबईमधील बहुतांश भागांवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार असल्याची माहिती असून महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेत्यांची मध्यस्थी अन् निवळला वाद
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस पक्षातील वाद मिटला असल्याचे दिसत आहे. मुंबईमध्ये शिवसेनेलाच जास्त जागा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाला 18 जागा, काँग्रेसला 14 जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला केवळ दोन जागा मिळणार असल्याचे समजते. दरम्यान, महाविकास आघाडीमधील जागावाटपावर आजच्या बैठकीनंतर शंभर टक्के तोडगा निघणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, जागावाटपावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद नाहीत, तिकडे महायुतीमध्ये तर जागेसाठी एकमेकांचे कपडे फाडणे सुरू आहे. तसेच महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटेल, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

 


कॉपी करू नका.