रावेर पोलिसांनी रोखली गोवंश तस्करी : दहा गायींची सुटका ; 15 लाखांची दोन वाहने जप्त
Raver police stopped cattle smuggling : ten cows were rescued ; Two vehicles worth 15 lakhs seized रावेर (30 ऑक्टोबर 2024) : रावेर तालुक्यातील पाल येथील शेरी नाक्यावर नाकाबंदीदरम्यान दोन वाहनातून कत्तलीच्या उद्देशाने होणारी गायींची तस्करी पोलिसांनी रोखत दहा गोवंशाची सुटका केली तसेच 15 लाख रुपये किंमतीची दोन वाहने पोलिसांनी जप्त केली. दोन गायी मृतावस्थेत आढळल्या. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना दोन वाहनांमधून अवैधपणे गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, हवालदार ईश्वर चव्हाण, जगदीश पाटील, पोलीस अमित तडवी यांना कारवाईचे आदेश दिले. 28 रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात पालमार्गे बोलेरो वाहन (क्रमांक एम.पी.10 झेड.एफ 5362) व अशोक लेलँड (क्रमांक एम.पी.10 झेड.एफ.2839) या वाहनांची शेरी नाक्याजवळ तपासणी केली असता या वाहनांमध्ये दोन लाख 61 हजार रुपये किंमतीच्या दहा गाई आढळल्या तर त्यातील दोन मृतावस्थेत आढळल्या.
संशयीतांविरोधात गुन्हा
गुरांना चारा पाण्याची सोय न करता अवैधरित्या गुरांना निर्दयतेने घट्ट बांधून कत्तलीसाठी नेत होते मात्र हा डाव उधळून लावत दोन लाख 61 हजारांची गुरे ताब्यात घेतली तर 15 लाख किंमतीचे दोन वाहन जप्त केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल दिनेश जाधव यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चालक नानला बुधा हिटले (रा.मलगाव, ता.झिरण्या) व राहुल छगन मौर्य ( मोडिया चिरिया, ता.झिरण्या) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार ईश्वर चव्हाण करीत आहेत.