रागाच्या भरात घर सोडून निघालेल्या चार मुली यावल पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुंबईत सापडल्या

तक्रारीची दाखल घेत अवघ्या काही तासातच चौघांचा लावला शोध


यावल (30 ऑक्टोबर 2024) : यावल तालुक्यातील वढोदा गावातून रागाच्या भरात 19 वर्षीय तरुणी आपल्यासोबत तीन अल्पवयीन मुलींना घेऊन सोमवारी घरून निघून गेली होती. अचानक चार मुली गावातून बेपत्ता झाल्यामुळे गावात खळबळ उडाली होती. दरम्यान, त्यांच्या पालकांनी यावल पोलीस ठाणे गाठले व यावल पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ याची दखल घेत सायबर विभाग, भुसावळ रेल्वे पोलीस, नाशिक पोलीस व कल्याण रेल्वे पोलीस यांची मदत घेत या चौघा मुलींचा शोध लावला आणि त्यांना कल्याण येथे ताब्यात घेतले. पोलिसांच्या सर्तकतेमुळे या चौघ्या मुली सुरक्षित आहेत व पोलिसांचे पथक त्यांना मुंबईला घेण्यासाठी रवाना झाले आहे. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

किरकोळ वादातून सोडले घर
वढोदा गावातील 19 वर्षीय तरुणी व तिच्या दोन 16 वर्षीय व एक 8 वर्षीय अशा तीन अल्पवयीन मैत्रिणी या कुटुंबाशी झालेल्या किरकोळ वादातून रागाच्या भरात सोमवारी आपल्या घरून निघून गेल्या होत्या. दरम्यान सायंकाळी मुली घरी परत न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी यावल पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, ठाणे अंमलदार सहायक फौजदार वसंत बेलदार, हेमंत सांगळे यांनी त्यांची तक्रार जाणून घेतली व तातडीने त्यांनी हवालदार इस्तियाक सय्यद, हवालदार मुकेश पाटील, सहायक फौजदार असलम खान, हवालदार वासुदेव मराठे, मोहन तायडे, योगेश खोंडे या पथकाला तपासाच्या सूचना केल्या या पथकाने तातडीने भुसावळ गाठले.









कल्याण स्थानकावर मुलींना उतरवले
भुसावळ रेल्वे पोलिसांची मदत घेतल्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या चौघे मुली सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुंबईच्या दिशेने जाणार्‍या एका रेल्वेत बसल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने नाशिक पोलिसांना माहिती दिली. नाशिक पोलिसांचे पथक रेल्वे स्थानकावर थांबले होते मात्र तिथे या चौघं मुली तेथे उतरल्या नाही व पुढे कल्याण येथील रेल्वे पोलीस गोरख गायकवाड यांना माहिती दिल्यानंतर मुलींना रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले व यावल पोलिसांना माहिती दिली. सध्या मुली कल्याण रेल्वे स्टेशनवर पोलिसांच्या ताब्यात आहेत. यावल पोलिसांचे पथक व या मुलींचे पालक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. या चौघा मुलींना आता तिथून सुरक्षित आणण्यात येत आहे. यावल पोलिसांच्या सर्तकतेमुळे रागाच्या भरात घरून निघून गेलेल्या या चौघा मुलींचा तत्परतेने शोध लावण्याने यावल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !