कुटुंबशाही नेस्तनाबूत करण्यासाठी आता युवा नेतृत्वाला साथ गरजेची : अॅड. प्रकाश आंबेडकर
पुणे (5 नोव्हेंबर 2024) : कुटुंबशाही नेस्तनाबूत करण्यासाठी आता युवा नेतृत्वाला साथ देण्याची गरज निर्माण झाल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खासदार अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दोन दिवसांपूर्वी पुण्यात आंबेडकर यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आहेत. आगामी काळात प्रचारसभांबाबत माहिती देताना ते म्हणाले की, 9 नोव्हेंबरपासून सोलापूर या ठिकाणी पहिली सभा होणार आहे. राज्यात चार सभा घेणार असून, त्यांपैकी एक सभा ही पुण्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबाबतची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
हा कुटुंबशाही प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न
राज्यातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांचे नातेसंबंध तपासले असताना काकाला मतदान केले काय किंवा पुतण्याला मतदान केले काय, त्यातून कुटुंबशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याच अॅड.आंबेडकर म्हणाले. राज्यातील अनेक मतदारसंघांत नात्यामधील माणसे ही एकमेकांच्या विरोधात उभी आहेत. त्यातून सत्ता ही कुटुंबाभोवतीच फिरते आहे, अशी स्थिती आहे. त्यामुळे नव्या युवा कार्यकर्त्याला संधी मिळत नसल्याचे समोर आले आहे. वंचितकडून या वेळीही युवा उमेदवार देण्यात आले असल्याने आमच्या हातात जनतेने सत्ता द्यावी, अशी मागणी आहे.
पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध
जाहिरनाम्यात आरक्षणाबाबत वंचित सुरक्षितता देईल, बोगस आदिवासी दाखले रद्द करू आणि हक्काच्या लोकांना त्याचे हक्क देऊ, अनुसूचित जाती-जमातीच्या उद्धारासाठी प्रयत्न करू, भटक्या विमुक्त समुदाय या संदर्भातील धोरण आणि जात जनगणना करून मंडल आयोगाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात येईल, मोहम्मद पैगंबर बिल विधिमंडळात मंजूर करू, अल्पसंख्यांक समूहासाठी धोरण, महिला सक्षमीकरण धोरण, महिलांना 3500 रुपये मासिक वेतनसह वर्षात तीन सिलेंडर मोफत देणार, सोयाबीन आणि कापूस वेचणी करणार्या मनरेगांकडून पाच हजार रुपये प्रति किलो वेचने अनुदान मिळणार, शेतमाल हमीभाव कायदा करणार, भाजीपाला फळ दूध आणि सर्व पिकांसाठी हमीभाव मिळणार. चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना 5 हजार रुपये मासिक पेन्शन देऊ. नवीन उद्योगांना अनुदान देऊ. तर केजी टू पीजी शिक्षण मोफतसह शासकीय पद भरती विद्यार्थ्यांसाठी वर्षभरातील सर्व परीक्षा फक्त शंभर रुपयांमध्ये विद्यार्थी परीक्षक सुविधा उपलब्ध करून देऊ अशी विविध आश्वासने देण्यात आली आहे.