मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील यांनी गड राखला : शिंदे सेनेची पकड घट्ट
विधानसभा निवडणूक विश्लेषण ः आमदार एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व संपुष्टात
गणेश वाघ
मुक्ताईनगर (26 नोव्हेंबर 2024) : राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते व 30 वर्ष आमदार राहिलेल्या एकनाथराव खडसे यांना मुक्ताईनगरात दुसर्यांदा गड राखता आला नाही. 2019 मध्ये भाजपाकडून व आता 2024 मध्ये राष्ट्रवादीकडून लढलेल्या अॅड.रोहिणी खडसे यांचा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दारुण पराभव केला. गेल्या 30 ते 35 वर्षांच्या राजकारणात आमदार खडसे यांचा हा सर्वात मोठा पराभव मानला जात असून त्यांची राजकारणावर यानिमित्त पकड सैल झाल्याचे बोलले जात आहे. गुन्हेगारी, वाढती महागाई आदी मुद्दे येथे निष्प्रभ ठरले तर छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्ताईनगरात बसवलेला अश्वारूढ पुतळा, लाडकी बहिण योजनेचा प्रसार, कोट्यवधींचा आणलेला निधी येथे आमदारांच्या विजयाचा मार्ग ठरला.
आमदार खडसेंना दुसर्यांदा पराभव
राज्यातील लक्षवेधी ठरलेल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदासंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील यांचा सलग दुसर्या वेळेस मिळविलेला विजय हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षासाठी मोठा धक्का ठरला आहे. भाजपाविरुध्द राष्ट्रवादी या नेहमीच्या विधानसभा लढतीत पराभवाचा सामना करणार्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची निवडणूक शिवसेना शिंदे पक्षाविरुध्द होती. येथेही त्यांना रोहिणी खडसे यांच्या रूपाने पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील हे एकाच वेळेस खडसेंची पकड आणि राष्ट्रवादीचे बळ यांचे जॉईंट किलर ठरले आहे.
मतदार संघातून खडसेंचा प्रभाव ओसरला
तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आमदार एकनाथराव खडसे आरोपानंतर मंत्री पदावरून पायउतार झाले व त्यानंतर 2019 मध्ये भाजपाने त्यांच्याऐवजी कन्या अॅड.रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली मात्र त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. 2024 च्या निवडणुकीत रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढल्या मात्र त्यांचा तब्बल 23 हजार 904 मतांनी पराभव झाला व महायुतीतील शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील सलग दुसर्यांदा विजयी झाले. आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासाठी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा वगळता कोणत्याही नेत्यांची जाहीर सभा झाली नाही मात्र कॉर्नर सभा, प्रत्यक्ष भेटीगाठी आणि स्लीपर सेल म्हणून कार्यरत समाजबांधव ताकदीने आमदार पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला.
मराठा फॅक्टरसह लाडक्या बहिणींच्या साथीने विजयाचा मार्ग सुकर
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी यामिनी पाटील, मुलगी संजना आणि प्रियंका यांनी महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे आले वा नाही याबाबत केलेली प्रेमाची विचारपूस, मतदारसंघात केलेली कामे व खेचून आणलेला कोट्यवधींचा निधी, मराठा फॅक्टर, शेत रस्ते व महायुतीच्या लोकाभिमुख घोषणा तसेच एकाच कुटुंबात पदे किती देणार हा ट्रेंड चालवल्याने मतदारांना तो भावल्याने आमदार पुनश्च विजयी झाले.
खडसेंची भूमिका मतदारांना रूचली नाही
लोकसभा निवडणुकीत आमदार एकनाथराव खडसे हे स्नुषा रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी उतरले व त्यांनी खडसे यांच्या विजयासाठी प्रयत्न केले मात्र त्यांचा भाजपा प्रवेश रखडल्यानंतर त्यांनी यू टर्न घेत आमदार अद्यापही राष्ट्रवादी सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसल्याचे व राष्ट्रवादीत असल्याचे सांगत मुलगी रोहिणी खडसेंच्या विजयासाठी रणनिती आखली. सुरूवातीला भाजपा व नंतर राष्ट्रवादीशी बांधिलकी अशा दुहेरी भूमिका आमदार खडसेंनी बजावल्याचे मतदारांना रूचले नाही व त्याचा परिणाम रोहिणी खडसेंच्या दारुण पराभवात झाला.